वॉशिंग्टन,
Plot to shoot at Hindu temple in America अमेरिकेतील इलिनॉय राज्यात हिंदू मंदिरात गोळीबार करण्याच्या कथित प्रयत्नानंतर धार्मिक आणि वांशिक द्वेषाच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची संघीय स्तरावर द्वेषप्रेरित गुन्हा म्हणून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अमेरिकेतील १०५ खासदारांनी केली आहे. यामध्ये चार सिनेटर्सचाही समावेश असून, खासदार राजा कृष्णमूर्ती यांच्या नेतृत्वाखाली एफबीआयचे संचालक काश पटेल यांना २० ऑक्टोबर रोजी पत्र पाठवण्यात आले. शिकागोजवळील अरोरा येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात एका १९ वर्षीय तरुणाने गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र, त्याची शॉटगन अडकल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या घटनेमागे वांशिक, जातीय किंवा धार्मिक पूर्वग्रह होते का, याची चौकशी करण्याची मागणी खासदारांनी केली आहे. पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये भारतीय-अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल, रो खन्ना, अमी बेरा आणि सुहास सुब्रमण्यन यांचाही समावेश आहे.
भारतीय-अमेरिकन समुदायाविरोधातील ऑनलाइन धमक्या आणि द्वेषपूर्ण संदेशांबाबतही या खासदारांनी चिंता व्यक्त केली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या काही अधिकृत संदेशांमुळे वांशिक आणि धार्मिक पूर्वग्रहांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. यासाठी त्यांनी होमलँड सिक्युरिटी विभागाच्या एका पोस्टचा उल्लेख केला. या पोस्टमध्ये शीख व्यक्तीचा फोटो वापरून, “आमच्या रस्त्यांवरून चालते व्हा, तुम्हाला गाडी चालवता येत नाही, मिस्टर सिंग,” असा संदेश देण्यात आला होता. तसेच, टेक्सास विद्यापीठाच्या फुटबॉल सामन्यात दक्षिण आशियाई लोकांच्या सहभागावर एका रिपब्लिकन नेत्याने आक्षेप घेतल्यानंतर शिक्षण विभागाने केलेल्या “कॉलेज फुटबॉलला पुन्हा महान बनवा” या पोस्टचाही संदर्भ देण्यात आला. प्रशासनाच्या संदेशांमुळे संबंधित समुदायांविषयीचा द्वेष कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती असल्याचे खासदारांनी नमूद केले. अरोरा येथील घटनेत संभाव्य धार्मिक किंवा वांशिक हेतूंची तपासणी सुरू आहे का, कथित कटाच्या प्रसारामध्ये ऑनलाइन व्यासपीठे किंवा अन्य व्यक्तींची भूमिका होती का आणि प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलली जात आहेत, असे प्रश्नही त्यांनी एफबीआयला विचारले आहेत.
दरम्यान, अमेरिकेतील दक्षिण आशियाई समुदायाविरोधातील द्वेषपूर्ण मजकुराच्या वाढत्या प्रमाणाकडेही या पत्रातून लक्ष वेधण्यात आले आहे. सप्टेंबर २०२६ मधील एका अहवालानुसार, जानेवारी २०२५ ते जून २०२६ या कालावधीत ‘एक्स’ या समाजमाध्यमावर दक्षिण आशियाई लोकांविरोधातील ५ लाख ४२ हजारांहून अधिक द्वेषपूर्ण पोस्ट्स आढळल्या. जानेवारी २०२४ ते जून २०२६ या काळात अशा पोस्ट्सच्या मासिक संख्येत जवळपास २४० टक्क्यांनी वाढ झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. कार्नेगी एंडोमेंटच्या सर्वेक्षणात ४८ टक्के भारतीय-अमेरिकन प्रतिसादकर्त्यांनी २०२५ च्या सुरुवातीपासून हिंसाचाराचा सामना करावा लागण्याची अपेक्षा व्यक्त केली. याशिवाय, प्रत्येक चारपैकी एका प्रतिसादकर्त्याने आपल्या समुदायाला लक्ष्य करणाऱ्या वंशद्वेषी पोस्ट्सचा वारंवार किंवा काही प्रमाणात सामना करावा लागल्याचे सांगितले, तर चारपैकी एकाने अपमानास्पद नावाने हाक मारण्यात आल्याचे नमूद केले. या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांची सुरक्षा, ऑनलाइन द्वेषाला आळा घालणे आणि भारतीय-अमेरिकन समुदायाच्या संरक्षणासाठी व्यापक संघीय उपाययोजना करण्याची मागणी खासदारांनी केली आहे.