मुंबई
President Droupadi Murmu नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्याकडे जात असताना या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना औपचारिक निमंत्रण देण्यात आले आहे. येत्या ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपती भवनात जाऊन दिले. या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्यातील मंत्री आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या भेटीचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रपतींना देण्यात आलेली विशेष कलात्मक भेटवस्तू. या भेटवस्तूमधून महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा, गोदावरी नदीचे महत्त्व, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि हस्तकलेचा वारसा उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

राष्ट्रपतींसाठी तयार करण्यात आलेले निमंत्रण केवळ औपचारिक पत्रापुरते मर्यादित नसून, त्यामागे एक आगळीवेगळी कलात्मक संकल्पना आहे. निमंत्रणाची पेटी उघडताच त्रिमितीय अर्थात पॉप-अप कलाकृतीच्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळ्याचे धार्मिक आणि पौराणिक महत्त्व उलगडते. कुंभमेळ्याची भव्यता, नाशिकचा सांस्कृतिक वारसा आणि पवित्र गोदावरी नदीचे स्थान यांचे दर्शन घडविणारी ही रचना तयार करण्यात आली आहे. दृष्टी, श्रवण, गंध, चव आणि स्पर्श या पंचेंद्रियांशी संबंधित अनुभवांची संकल्पनाही या निमंत्रणातून मांडण्यात आली आहे.
३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासह गोदा आरती आणि अन्य कार्यक्रमांसाठीही राष्ट्रपतींना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन, कुंभमेळा गीताचे लोकार्पण, कुंभमेळ्यावर आधारित कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आणि कुंभमेळ्याच्या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण या कार्यक्रमांचा समावेश आहे. या भेटीदरम्यान अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर आणि त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या विशेष भेटवस्तू संचात महाराष्ट्राच्या आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या उत्पादनांनाही महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत शबरी नॅचरल्सच्या माध्यमातून तयार होणाऱ्या विविध वस्तूंचा त्यात समावेश आहे. अगरबत्ती, भरडधान्यांपासून बनविलेले खाद्यपदार्थ, मोहफुलांपासून तयार केलेली उत्पादने, बांबूपासून बनविलेल्या वस्तू आणि वनमध यांचा या संचात समावेश करण्यात आला आहे. या उत्पादनांच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान, कारागिरांचे कौशल्य आणि स्थानिक उद्योजकतेची क्षमता अधोरेखित करण्यात आली आहे. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे, हा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचे प्रतीक असलेल्या येवला येथील पैठणीचाही या भेटवस्तू संचात समावेश आहे. त्याचबरोबर नाशिकच्या कृषीवैभवाची ओळख करून देणारे काळे मनुके आणि काजू तसेच शहराच्या खाद्यसंस्कृतीशी जोडलेला प्रसिद्ध नाशिकचा चिवडा भेटवस्तूचा भाग आहेत. निवडक मिठाई आणि सुकामेव्याचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या संचातून राज्याची आध्यात्मिक परंपरा, हस्तकला, कृषिसमृद्धी, खाद्यसंस्कृती आणि आदिवासी समाजाचे योगदान यांचे एकत्रित दर्शन घडते.नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध स्तरांवर तयारी सुरू असून, ३१ ऑक्टोबरचा ध्वजारोहण सोहळा हा या पर्वातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. राष्ट्रपतींना निमंत्रण देण्याबरोबरच महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि कुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे. गोदामाईचा महिमा, कुंभमेळ्याचे धार्मिक वैभव आणि राज्याच्या समृद्ध परंपरांचा वारसा एका कलात्मक भेटवस्तूच्या माध्यमातून राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविण्याची संकल्पना या निमंत्रणाचे प्रमुख आकर्षण ठरली आहे.