नवी दिल्ली,
Prime Minister Modi's appeal देशाची एकता, प्रतिष्ठा आणि सांस्कृतिक मूल्यांना आव्हान देणाऱ्या घटकांचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशाने एकजुटीने पुढे येण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्लीतील आय. पी. एक्सटेंशन येथील दिल्ली विकास प्राधिकरणाच्या (डीडीए) उत्सव मैदानावर आयोजित दसरा महोत्सवात रावणदहनानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी देशवासीयांना विजयादशमीच्या शुभेच्छा देत प्रभू श्रीरामांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.

देशाच्या मान-सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या शक्ती, समाजात फूट पाडणारे घटक आणि भारतीय संस्कृतीचा द्वेष करणारी मानसिकता ही देशासमोरील तीन प्रमुख आव्हाने असल्याचे मोदी यांनी नमूद केले. या आव्हानांचा सामना करण्यासाठी सामाजिक एकता आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभू श्रीरामांच्या आदर्शांचा उल्लेख करताना त्यांनी रामराज्याची संकल्पना स्पष्ट केली. भेदभावाला स्थान नसलेली, प्रत्येकाला न्याय मिळणारी आणि सर्वांना प्रगतीची समान संधी उपलब्ध करून देणारी शासनव्यवस्था म्हणजे रामराज्य होय. शासनाचा मुख्य उद्देश जनकल्याणासोबतच गरीब आणि वंचित घटकांची सेवा करणे हा असला पाहिजे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
‘विकसित भारत’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशाने स्वतःच्या सामर्थ्यावर आणि संसाधनांवर विश्वास ठेवण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारत स्वयंपूर्ण झाल्यास विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रभू श्रीरामांनी प्रतिकूल परिस्थितीतही सत्य आणि नीतीचा मार्ग सोडला नाही. त्यांच्या जीवनातून संकटांचा सामना स्वतःच्या सामर्थ्याच्या बळावर करण्याची प्रेरणा मिळते, असे मोदी यांनी सांगितले. विजयादशमीचा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश देतो. हा संदेश आत्मसात करून धैर्य, सकारात्मक विचार आणि एकजुटीच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.