राजा भैयांचे ५०० शस्त्रांसह शक्तिप्रदर्शन

‘एवढेच आहेत असं समजू नका’, विधानाने चर्चेला उधाण

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
उत्तर प्रदेश
Raghuraj Pratap Singh उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे विजयादशमीच्या निमित्ताने कुंडा मतदारसंघाचे आमदार आणि जनसत्ता दल लोकतांत्रिकचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुराज प्रताप सिंह ऊर्फ राजा भैया यांनी पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन केले. बेंती राजभवन येथे वैदिक मंत्रोच्चारांच्या वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात जवळपास ५०० लहान-मोठ्या बंदुकांसह विविध शस्त्रांची पूजा करण्यात आली. मात्र, या धार्मिक विधीपेक्षा राजा भैया यांनी केलेल्या एका विधानाचीच अधिक चर्चा रंगली आहे. ‘एवढेच आहेत असं समजू नका,’ असे म्हणत त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
 

Raghuraj Pratap Singh Raja Bhaiya Weapon Puja: 500 Guns Displayed, Viral Statement Sparks Debate 
राजा भैया यांच्यासाठी विजयादशमीचा उत्सव हा केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नसून, तो त्यांच्या वंशपरंपरेशी आणि क्षत्रिय संस्कृतीशी जोडलेला आहे. त्यामुळे बेंती राजभवनातील त्यांचा शस्त्रपूजन सोहळा दरवर्षी चर्चेचा विषय ठरतो. यंदाही शस्त्रपूजनासाठी किती शस्त्रे मांडली जाणार, याबाबत उत्सुकता होती. विशेषतः गेल्या वर्षी त्यांच्या पत्नी राणी भानवी सिंह यांनी शस्त्रांवरून केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याकडे अधिक लक्ष लागले होते.
विजयादशमीच्या दिवशी बेंती राजभवनात पुरोहित आणि वैदिक आचार्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर शस्त्रांना पुष्प अर्पण करून आरती करण्यात आली. या सोहळ्यासाठी सुमारे ५०० हून अधिक शस्त्रे प्रदर्शित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शस्त्रपूजनानंतर राजा भैया यांनी केलेल्या विधानामुळे या कार्यक्रमाला वेगळेच राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले.
‘एवढेच आहेत असं समजू नका; हत्तीचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात,’ असे विधान राजा भैया यांनी यावेळी केले. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका रोख काय, याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या वर्षी शस्त्रांवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विधानाकडे पाहिले जात असून, शस्त्रपूजनाच्या निमित्ताने त्यांनी केलेले हे सूचक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे राजा भैया यांचे विधान यंदाच्या विजयादशमीच्या सोहळ्याची सर्वाधिक चर्चिली जाणारी बाब ठरले आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी Raghuraj Pratap Singh राजा भैया यांच्या शस्त्रपूजनावरून कौटुंबिक वादही समोर आला होता. त्यांच्या पत्नी राणी भानवी सिंह यांनी शस्त्रांबाबत गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी त्यांनी पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे यंदाच्या शस्त्रपूजनाला गेल्या वर्षीच्या वादाची पार्श्वभूमी लाभली आहे.
दुसरीकडे, गेल्या वर्षीच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना राजा भैया यांनी शस्त्रपूजनासाठी ठेवलेली शस्त्रे ही त्यांच्या कुटुंबीयांची, सुरक्षा रक्षकांची आणि समर्थकांची असल्याचे सांगितले होते. या सर्व शस्त्रांसाठी वैध परवाने असल्याचा दावाही करण्यात आला होता. तसेच, आपल्या समर्थकांशी आपले कौटुंबिक संबंध असल्याचेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा शस्त्रपूजनाचा सोहळा आणि त्यावेळी केलेले विधान यांमुळे राजा भैया चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.