तुझी औकात काय?

रामदास कदमांचा मनोज जरांगेंवर घणाघात

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
मुंबई,
Ramdas Kadam attacks Manoj Jarange मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी मंगळवारी मुंबईतील दसरा मेळाव्यात जोरदार हल्लाबोल केला. जरांगे हे सुपारी घेऊन शिंदे यांच्यावर टीका करत असल्याचा आरोप करत कदम यांनी त्यांच्या विधानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “तुझी औकात काय आहे?” असा सवाल करत त्यांनी जरांगे यांच्या उपोषणावरही आक्षेप घेतला. उपोषणादरम्यान ते बाथरूममध्ये जाऊन गुपचूप खात असल्याचा आरोप कदम यांनी केला. तसेच, एकनाथ शिंदे यांना विनंती करून जरांगे यांच्या आरोपांची आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. मराठा समाजाने समाजाला न्याय मिळावा यासाठी जरांगे यांना पाठिंबा दिला; मात्र या पाठिंब्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचा दावा कदम यांनी केला.
 
 
 
jaranges
 
रामदास कदम यांनी जरांगे यांच्या संपत्तीबाबतही प्रश्न उपस्थित केले. मराठा समाजाचे नेतृत्व करू लागल्यानंतर त्यांची संपत्ती कुठे आहे, ती कोणाच्या नावावर आहे आणि त्यांच्या नातेवाइकांच्या नावावर कोणती मालमत्ता आहे, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. “एकदा दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या,” असे म्हणत जरांगे यांच्या आरोपांची सत्यता तपासण्याचे आवाहन त्यांनी केले. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिल्याचा उल्लेख करत कदम यांनी शिंदे यांची बाजू घेतली. शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपयांचा आरोप केला जात असल्याचा संदर्भ देत त्यांनी पुरावे सादर करण्याचे आव्हानही जरांगे यांना दिले. एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांचे आणि मराठा समाजाचे दैवत असल्याचे सांगत त्यांच्याविषयीच्या वक्तव्यांवर महाराष्ट्र आणि मराठा समाज गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
 
 
मराठा समाजाचा पहिला मेळावा संभाजीनगर येथे कोणी आयोजित केला होता, असा सवाल उपस्थित करत कदम यांनी जरांगे यांच्या नेतृत्वावर टीका केली. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्याविषयी एकेरी भाषेत बोलण्याच्या पद्धतीवरही त्यांनी आक्षेप घेतला. समाजाने न्यायासाठी जरांगे यांना साथ दिली, मात्र त्या विश्वासाचा गैरवापर होता कामा नये, असे ते म्हणाले. शिंदे, कदम आणि भोसले हे मराठा समाजातील असून ते लाचार नाहीत, असे सांगत त्यांनी शिंदे यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले. यापुढे जरांगे यांना मराठा समाज आणि शिवसैनिकांचा सामना करावा लागेल, असा इशाराही रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात दिला.