गोंदिया,
ratnara-tipper-accident-protestतालुक्यातील रतनारा येथे टिप्परच्या धडकेने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अद्यापही मुख्य आरोपी आणि वाहन मालकाला अटक न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष पसरला आहे. संतप्त हजारो महिला व पुरुषांनी आरोपींच्या तातडीच्या अटकेची आणि पीडित कुटुंबाला योग्य मुदतीत न्याय व आर्थिक मोबदला मिळण्याची मागणी करत तेथील मुख्य मार्गावर मृतदेह ठेवून चक्का जाम आंदोलन पुकारले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व इतर पुरावे अनेक ठिकाणी उपलब्ध असूनही पोलिसांनी अद्याप वाहन मालक व दोषी आरोपींना ताब्यात घेतलेले नाही. यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. जोपर्यंत सर्व आरोपींना अटक करून योग्य न्याय व मोबदला मिळत नाही, तोपर्यंत हा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्याचा पवित्रा हजारो ग्रामस्थांनी घेतला आहे.
या दुर्घटनेत मृत पावलेल्या युवकाच्या दोन लहान मुलांनीही शासनाकडे व प्रशासनाकडे न्यायाची पुकार करत आपल्या वडिलांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्यांना तात्काळ शिक्षा देण्याची आर्त हाक दिली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलक ग्रामस्थांनी घेतली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ गाठून आंदोलकाना शांत करण्याचा प्रयत्न केला जात असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. बातमीलिहीपर्यंत मृताचे नाव कळलेले नव्हते.