रिंकू राजगुरूच्या नजरेत दडलंय काय?

‘जिजाई’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता; २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत दाखल होणार

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
मुंबई
rinku rajguru कपाळावर लाल चंद्रकोर, डोळ्यांत विलक्षण चमक आणि नजरेतून व्यक्त होणारा अनोळखी भाव… अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या या रूपाने ‘जिजाई’ या आगामी मराठी चित्रपटाच्या नव्या पोस्टरमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पोस्टरमध्ये रिंकूचा चेहरा पूर्णपणे न दाखवता तिच्या डोळ्यांवर आणि कपाळावरील चंद्रकोरीवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे तिच्या व्यक्तिरेखेचे स्वरूप आणि तिच्या नजरेमागील कथा जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत हा चित्रपट येत्या २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
 

rinku rajguru jijai movie poster unveiled, marathi film to release on november 20 
‘जिजाई’च्या पोस्टरची मांडणी रहस्यमय असून, त्यातून चित्रपटाच्या कथेविषयी अनेक प्रश्न उपस्थित होतात. रिंकूच्या डोळ्यांतील भाव, चेहऱ्यावर पडणारा प्रकाश आणि कपाळावरील लाल चंद्रकोर यांचा प्रभावी वापर पोस्टरला वेगळे दृश्यात्मक रूप देतो. त्यात सोनेरी अक्षरांत झळकणारे चित्रपटाचे शीर्षकही लक्षवेधी ठरते. मात्र, रिंकू नेमकी कोणती व्यक्तिरेखा साकारत आहे, तिच्या कपाळावरील चंद्रकोरीमागे काय अर्थ दडला आहे आणि तिच्या नजरेतून कोणती गोष्ट उलगडणार आहे, याबाबत निर्मात्यांनी अद्याप तपशील जाहीर केलेला नाही.
दिग्दर्शक तृशांत इंगळे यांनी या चित्रपटाची धुरा सांभाळली आहे. झी स्टुडिओजने चित्रपटाची निर्मिती केली असून, कोकोनट फिल्म्सने सहनिर्मिती केली आहे. आजच्या स्त्रीचा संघर्ष आणि तिच्यातील लढाऊ वृत्ती हा चित्रपटाच्या आशयातील महत्त्वाचा भाग असल्याचे दिग्दर्शकांनी स्पष्ट केले आहे.
चित्रपटाच्या पोस्टरमागील संकल्पनेविषयी बोलताना दिग्दर्शक तृशांत इंगळे म्हणाले, “प्रत्येक व्यक्तिरेखेला स्वतःची एक गोष्ट असते आणि ती गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची ताकद चित्रपटाच्या मांडणीत असते. ‘जिजाई’च्या बाबतीतही आम्ही काहीतरी वेगळं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात हा चित्रपट आजच्या स्त्रीचा आहे. जी लढवय्या आहे. पोस्टरमधून प्रेक्षकांना कथेची उत्सुकता वाटावी आणि त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण व्हावेत, अशी आमची इच्छा होती. रिंकूने या भूमिकेला दिलेला न्याय आणि चित्रपटातील तिचं रूप प्रेक्षकांसाठी नक्कीच खास असेल.”
झी स्टुडिओजचे मराठी व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनीही चित्रपटाबद्दल विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “झी स्टुडिओज नेहमीच वेगळ्या आशयाच्या आणि प्रेक्षकांना नव्या अनुभवाची ओळख करून देणाऱ्या चित्रपटांना प्राधान्य देत आलं आहे. ‘जिजाई’ हा त्याच प्रवासातील एक महत्त्वाचा चित्रपट आहे. रिंकू राजगुरूसारखी गुणी अभिनेत्री आणि नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे यांच्यासोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आणखी वाढेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
नुपूर गुहा आणि तुषार राऊत rinku rajguru हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. रिंकू राजगुरूच्या मध्यवर्ती भूमिकेसोबतच चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार, याबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. पोस्टरमधील सूचक दृश्यरचना आणि स्त्रीकेंद्री कथानकाची दिलेली झलक यांमुळे ‘जिजाई’ने प्रदर्शनापूर्वीच लक्ष वेधून घेतले आहे. आता या पोस्टरमधून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे चित्रपटातून कशी मिळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ‘जिजाई’ येत्या २० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.