दुष्काळात तेरावा महिना

देवी विसर्जनाने धाम गढुळ!

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
वर्धा
sacred-site-murky पवनार येथील धाम नदीची दुर्गा विसर्जनानंतर दयनीय अवस्था झाली आहे. नदीत ठिकठिकाणी निर्माल्य, प्लॅस्टिक आणि सजावटीच्या साहित्याचा खच साचल्याने नदी अक्षरशः गटारासारखी दिसु लागली आहे. विशेष म्हणजे कमी पाणी असलेल्या या नदीत आता देवीचे सांगाडेही उभे आहेत. नऊ दिवस आराधना करताना विसर्जनानंतर देवीची विटंबना होताना दिसत आहे.
 
murty
उत्सवानंतर नदीत साचणारे निर्माल्य आणि टाकाऊ साहित्य यामुळे नदीच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विसर्जनानंतर नदीच्या पाण्यात आणि काठावर प्लॅस्टिकच्या पिशव्या, फुले, सजावटीचे अवशेष तसेच इतर कचरा विखुरलेला आहे. काही भागात देवीचे लाकडी सांगाडेही उभे आहेत. नदीचे धार्मिक महत्त्व जपले जात असताना तिच्या स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष होते.
दुर्गामूर्तींच्या विसर्जनादरम्यान मोठ्या प्रमाणावर निर्माल्य आणि इतर कचरा जमा होण्याची शयता प्रशासनाला माहीत असते. मात्र, विसर्जनापूर्वी निर्माल्य संकलन, स्वतंत्र कचरापेट्या आणि कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी पुरेशी व्यवस्था का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांच्या नियोजनावरच प्रश्न उपस्थित होत आहे. गणेश विसर्जनाकरिता स्वतंत्र कुंड तयार केला असताना पाणी टंचाईच्या काळात दुर्गा विसर्जनाकरिता त्याच कुंडाचाच वापर करण्याचे निर्बंध प्रशासनाच्या वतीने का टाकण्यात आले नाहीत.
 
प्लॅस्टिक आणि इतर टाकाऊ साहित्यामुळे नदीला धोका निर्माण होऊ शकतो. नदीच्या पाण्याचा वापर कोणत्या कारणांसाठी केला जातो, यानुसार नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे धाम नदीतील प्रदूषणाकडे केवळ स्वच्छतेची समस्या म्हणून न पाहता पर्यावरणाच्या दृष्टीने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
 
विसर्जनानंतर नदीपात्रात कचरा साचण्याची समस्या दरवर्षी उद्भवत असेल, तर त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. दुर्गामूर्तींच्या विसर्जनानंतर पवनार येथील धाम नदीत निर्माल्य, प्लॅस्टिक आणि सजावटीच्या साहित्याचा खच साचला आहे. दरवर्षी अशीच स्थिती निर्माण होत असतानाही प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना होताना दिसत नाही.
शिवाजी चौक वाचवा!
दुर्गादेवी स्थापनेला मंडपात घेऊन जाताना काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आणि दोन दिवसांपासुन सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीत तोफेतुन उडवण्यात आलेले चिटोरे कागदं शहरात सर्वत्र विखुरलेले आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज या मिरवणुकांचा समारोप होताना मोठ्या प्रमाणात या भागातही गुलाल, उडवण्यात येणारी कागदं, झिल्ली, पाण्याच्या बॉटल, लंगरमधील द्रोण त्याच ठिकाणी पडुन असतात. त्यामुळे शिवाजी महाराजांवर प्रेम करणार्‍या काही मावळ्यांनी हातात फलकं घेऊन शिवाजी महाराज चौक स्वच्छ ठेवा असे आवाहन करणारे फलकं घेऊन हॉटेल राधिका पुढे उभे असल्याने देवी मंडळांच्या सदस्यांमध्ये झणझणीत अंजन घातले.