टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात अटकेचे सत्र तिघांना ३१ ऑक्टोबरपर्यंत कोठडी

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
मुंबई

Tiger Shroff अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित जुहू गोळीबार प्रकरणात तपासाला वेग आला असून, न्यायालयाने तीन आरोपींना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रेहान अन्सारी, फूलसिंग आणि ऋतिक महतो ऊर्फ रोशन अशी या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासादरम्यान दिल्ली आणि हरियाणा येथून आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. या घटनेमागील कट, आर्थिक व्यवहार आणि गोळीबारासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
 

Tiger Shroff Firing Case: 3 Accused in Police Custody Till October 31, 5 More Arrested 
या प्रकरणातील तिन्ही आरोपींना बुधवारी (२१ ऑक्टोबर) ३७व्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षाने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. गोळीबारासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे अद्याप जप्त करण्यात आलेली नाहीत. तसेच, गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन आरोपींनी नष्ट केल्याचा दावा पोलिसांनी केला. त्यामुळे शस्त्रांचा शोध घेणे, मोबाईल फोनची विल्हेवाट कशी लावण्यात आली हे समजून घेणे आणि गुन्ह्यामागील संपूर्ण कट उघड करणे आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले.
आर्थिक व्यवहार आणि कटाचा तपास सुरू
गोळीबाराच्या घटनेमागे नेमके कोण होते आणि या गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाची भूमिका काय होती, याचा उलगडा अद्याप झालेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणाशी संबंधित आर्थिक व्यवहारांची माहिती मिळवणे तसेच आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी कोणती पद्धत वापरली, याचा तपास करणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. गुन्ह्याचे गांभीर्य आणि त्यामागे व्यापक कट असण्याची शक्यता लक्षात घेता आरोपींची अधिक चौकशी आवश्यक असल्याचेही सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
मात्र, रेहान अन्सारीच्या वतीने बाजू मांडणारे वकील अजिंक्य मिरगळ यांनी पोलीस कोठडी वाढवण्याच्या मागणीला विरोध केला. पोलिसांनी यापूर्वीच कोटा येथून ट्रान्झिट रिमांडद्वारे आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच, या प्रकरणात अन्य आरोपींनाही अटक करण्यात आली असल्याने तिन्ही आरोपींना आणखी पोलीस कोठडीत ठेवण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आरोपींना पोलीस कोठडीऐवजी दंडाधिकारी कोठडीत पाठवावे, अशी विनंतीही त्यांनी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
आधी दुसऱ्या प्रसिद्ध कलाकाराला लक्ष्य करण्याचा संशय
मुंबई गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, गोळीबारातील तीन संशयित हल्लेखोर सुरुवातीला बॉलिवूडमधील आणखी एका प्रसिद्ध कलाकाराला लक्ष्य करण्याच्या तयारीत होते, असा संशय आहे. मात्र, त्या कलाकाराभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी टायगर श्रॉफला लक्ष्य केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. संबंधित कलाकाराचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही. या कथित कटामागील नेमकी कारणे आणि त्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची भूमिका स्पष्ट करण्यासाठी तपास सुरू आहे.
जुहूमध्ये रविवारी झाला होता गोळीबार
रविवारी (१८ ऑक्टोबर) सायंकाळी Tiger Shroff सुमारे सातच्या सुमारास मुंबईतील जुहू परिसरात ही घटना घडली. टायगर श्रॉफ एका फुटबॉल क्लबमधून बाहेर पडत असताना गोळीबार करण्यात आला. या घटनेत टायगर श्रॉफला कोणतीही दुखापत झाली नाही; मात्र त्याचा चालक जखमी झाला. घटनेनंतर अभिनेत्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून केला जात असून, दिल्ली आणि हरियाणातून अटक करण्यात आलेल्या पाच जणांना मुंबईत आणल्यानंतर तपासाला आणखी दिशा मिळण्याची शक्यता आहे. गोळीबारासाठी वापरलेली शस्त्रे, नष्ट करण्यात आल्याचा दावा असलेले मोबाईल फोन, आर्थिक व्यवहार आणि कथित कटामागील सूत्रधार यांचा शोध घेणे हे पोलिसांसमोरील प्रमुख आव्हान आहे.