कोलंबिया,
gold-mine-collapses-leaving-14-dead दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात सोन्याची खाण कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. नारिनो प्रांतातील दुर्गम भागात असलेल्या एका बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या खुल्या खाणीत ही घटना घडली. या दुर्घटनेत १४ कामगारांचा मृत्यू झाला असून, अन्य सात जण जखमी झाले आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी घडलेल्या या घटनेनंतर बचाव आणि शोधमोहीम राबविण्यात आली. सोमवारी रात्री ही मोहीम पूर्ण करण्यात आली. नारिनो प्रांतातील सांता बार्बरा दे एस्कुआंदे या छोट्या शहराजवळ ही दुर्घटना घडली. घनदाट वर्षावनाने वेढलेल्या या भागात पोहोचण्यासाठी बोटी किंवा लहान विमानांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचताना अडचणींचा सामना करावा लागला.
तीन महिन्यांत दुसरी मोठी दुर्घटना
नारिनो प्रशासनाने या घटनेबाबत चिंता व्यक्त करत अनधिकृत आणि अनौपचारिक खाणकामातील धोक्यांकडे लक्ष वेधले आहे. गेल्या तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या प्रांतातील दोन खाणी कोसळल्या असून, या दोन्ही दुर्घटनांमध्ये मिळून २७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे खाणकामातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नारिनोचे गव्हर्नर लुईस अल्फोन्सो एस्कोबार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. या दुर्घटनेमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
बेकायदेशीर खाणकामासह सुरक्षेचे आव्हान
कोलंबियामध्ये शेकडो लहान खाणी सरकारी परवानगीशिवाय सुरू असल्याचे सांगितले जाते. यातील काही खाणींवर सशस्त्र बंडखोर गटांचे नियंत्रण असल्याने संबंधित भागांमध्ये सुरक्षा आणि प्रशासनासमोर अनेक आव्हाने निर्माण होतात. सांता बार्बरा दे एस्कुआंदे परिसरातही दोन सशस्त्र गट सक्रिय असल्याचे वृत्त आहे. त्यामध्ये 'जाकोबो अरेनास ब्लॉक' या गटाचा समावेश आहे. या गटाचे नेतृत्व २०१६ मध्ये कोलंबिया सरकारसोबत झालेल्या शांतता करारात सहभागी न झालेल्या 'रिव्होल्युशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया' (FARC) च्या माजी सदस्यांकडे असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, कोलंबियाच्या लोकपाल कार्यालयाने या भागातील सशस्त्र गटांना मानवतावादी मदत पोहोचविण्यास अडथळे निर्माण करू नयेत, असे आवाहन केले आहे. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविणे आणि बाधित नागरिकांना मदत करणे यालाच सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील निवेदनातून स्पष्ट केले.