कसाबला पहिल्यांदा पाहिल्यानंतर उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया काय होती?

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
मुंबई
ujjwal nikam २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. त्या रक्तरंजित रात्री अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. दहशतवाद्यांचा क्रूर चेहरा आणि मुंबईकरांनी दाखवलेले धैर्य यावर अनेक चित्रपटांची निर्मिती झाली. मात्र, या हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला न्यायालयीन प्रक्रियेनंतर फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी न्यायालयात नेमके काय घडले, याची झलक ‘प्रहार’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. कसाबला पहिल्यांदा पाहिल्यानंतर आपली प्रतिक्रिया काय होती, याबाबत निकम यांनी एका मुलाखतीत भाष्य केले.
 
 

ujjwal nikam reveals his first reaction to ajmal kasab, shares insights about prahar movie 
गुन्हेगाराला पाहिल्यानंतर मनात संताप निर्माण होतो का, या प्रश्नाचे उत्तर देताना उज्ज्वल निकम म्हणाले की, कोणत्याही गुन्हेगाराला पाहून त्यांना संताप येत नाही. कारण रागाच्या भरात काम करणे शक्य होत नाही. त्याऐवजी ते संबंधित गुन्हेगाराला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्याने गुन्हा का केला, त्यामागे कोणती परिस्थिती होती आणि त्याच्यात गुन्हेगारी प्रवृत्ती कशी निर्माण झाली, या प्रश्नांचा ते अभ्यास करतात.
‘परमेश्वर प्रत्येकाला जन्माला घालताना गुन्हेगार बनवत नाही. प्रत्येक व्यक्ती जन्मतः गुन्हेगार नसते; त्यामागे काही परिस्थिती असू शकते. गुन्हेगारी प्रवृत्ती कधी आणि का निर्माण झाली, तसेच संबंधित व्यक्ती त्या प्रवृत्तीपासून कधी दूर गेली का, हे समजून घेणे महत्त्वाचे असते. अशा प्रश्नांचा अभ्यास करणे वकिलासाठी आवश्यक आहे,’ असे निकम यांनी स्पष्ट केले.गुन्हेगारांशी संवाद साधण्याची आपली पद्धत सांगताना त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन बाजूंचाही उल्लेख केला. गुन्हेगाराशी बोलताना ते सहज आणि अनौपचारिक पद्धतीने ujjwal nikam  संवाद साधतात. ‘क्या रे, कैसे चल रहा है… सब ठीक ना…’ अशा प्रकारे बोलत ते समोरच्या व्यक्तीशी जवळीक निर्माण करतात. मात्र, या संवादामागे एक उद्देश असतो. आपला प्रभाव समोरच्या व्यक्तीवर राहावा आणि तिने अनावश्यक गोंधळ घालू नये, यासाठी ही पद्धत उपयोगी पडते, असे त्यांनी सांगितले.न्यायालयात युक्तिवाद करताना मात्र त्यांची भूमिका वेगळी असते. ते कोणालाही वैयक्तिक शत्रू मानत नाहीत; परंतु काम करून घेण्यासाठी कधी कठोर भूमिका घ्यावी लागते. सुरुवातीला आपला स्वभाव पोलिस अधिकाऱ्यांना कठोर वाटतो, पण नंतर त्यामागचा उद्देश त्यांच्या लक्षात येतो, असेही निकम यांनी सांगितले. खटल्याच्या कामकाजात पोलिस अधिकाऱ्यांची मदत आणि मेहनत अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
‘प्रहार’ चित्रपटाबाबत बोलताना निकम यांनी स्पष्ट केले की, चित्रपटात त्यांची भूमिका आणि चेहरा दिसत असला, तरी त्यामागे पोलिसांनी घेतलेले कष्ट, तपासातील मेहनत आणि संविधानाने दिलेली न्यायव्यवस्था यांचेही महत्त्व आहे. या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रण ‘प्रहार’मध्ये पाहायला मिळेल, असे त्यांनी सांगितले.