गडचिरोली,
70-year-old-woman-killed-in-tiger-attack दसर्याच्या सणानिमित्त परिसरात आनंदाचे वातावरण असतानाच एटापल्ली तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जारावंडीलगतच्या सरखेडा ग्रामपंचायतीअंतर्गत येणार्या इरपनपायली गावाजवळील शेतात धान कापण्यासाठी गेलेल्या बिलाशी आनंद बा. (70) या वृद्ध महिलेवर वाघाने हल्ला करून त्यांना जागीच ठार केल्याची घटना 19 ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे इरपनपायलीसह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सणाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे.
मृतक बिलाशी आनंद बा. या सकाळी गावाजवळील शेतात धान कापण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. मृतक महिलेच्या पश्चात पती, तीन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. कुटुंबातील ज्येष्ठ महिलेचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जारावंडी परिसरातील दोलंदा येथे यापूर्वी वाघाच्या हल्ल्यात हरी बोहरण वड्डे (57) यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी वाघाच्या बंदोबस्तासाठी जनआंदोलन करून वन विभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली होती. मात्र, आता पुन्हा एका वृद्ध महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने गडचिरोली जिल्ह्यातील जंगलालगतच्या गावांमधील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. सातत्याने होत असलेल्या या घटनांमुळे शेतात काम करण्यासाठी जाणार्या नागरिकांमध्ये भीती वाढत आहे.
या पृष्टभूमीवर वन विभागाने केवळ सतर्कतेचे आवाहन न करता वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी होत आहे. शेतात जाणार्या शेतकरी आणि मजुरांच्या सुरक्षेसाठी विशेष गस्त, जनजागृती, गावपातळीवर पूर्वसूचना आणि आवश्यक संरक्षणात्मक उपाय करावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. सणाच्या दिवशी आनंदाऐवजी दुःखाचा प्रसंग ओढवल्याने आता तरी वन विभाग आणि प्रशासनाने या घटनांचे गांभीर्य ओळखून ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.