आजोबा-नातवाच्या नात्याची हळवी गोष्ट उलगडणार

‘आदि अनंत’चा ट्रेलर प्रदर्शित

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
मुंबई
aadi anant trailer कधी हट्ट, कधी मिश्किल संवाद, तर कधी एकमेकांना दिलेली साथ… अशा विविध भावभावनांनी नटलेल्या आजोबा-नातवाच्या नात्याची अनोखी कहाणी ‘आदि अनंत’ या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे, ट्रेलरचे अनावरण चित्रपटातील कलाकारांच्या कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे या सोहळ्याला वेगळीच कौटुंबिक रंगत लाभली.
 

aadi anant trailer 
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात दोन पिढ्यांमधील नात्याचे विविध पैलू उलगडणार आहेत. आजी-आजोबांच्या सवयी, नातवंडांचे हट्ट, त्यातून घडणारे गमतीशीर प्रसंग आणि नात्यांमधील भावनिक गुंतागुंत यांची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. विचारांमधील फरक असूनही एकमेकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न आणि मनात दडलेली आपुलकी यांतून कथानक पुढे सरकते. विनोद आणि भावनिक प्रसंग यांचा मेळ साधत हा चित्रपट कौटुंबिक मनोरंजनाची अनुभूती देण्याचा प्रयत्न करतो.
दिग्दर्शक महेश लिमये यांनी चित्रपटामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आजोबा आणि नातवाच्या नात्यातील सहजता आणि त्यांच्यात घडणाऱ्या छोट्या-छोट्या प्रसंगांना त्यांनी विशेष महत्त्व दिले आहे. या नात्यातील गंमत, मतभेद आणि शब्दांत व्यक्त न होणारी जवळीक प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपट पाहताना प्रेक्षकांना आपल्या घरातील माणसांची आठवण येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कथानक आजोबा-नातवाच्या नात्याभोवती फिरत असले, तरी त्यातील भावना प्रत्येक नात्याशी जोडल्या जाणाऱ्या आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा चित्रपट असल्याचेही त्यांनी नमूद केले.
निर्माते समीर हंपी आणि अनिकेत मराठे यांनीही चित्रपटाच्या विषयाबद्दल समाधान व्यक्त केले. नात्यांमधील वेगळेपणा आणि कथेतला साधेपणा यांमुळे ‘आदि अनंत’ची गोष्ट भावल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबीयांसोबत घालवलेल्या वेळेचे महत्त्व या चित्रपटातून अधोरेखित होते. अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांची जोडी कथेला वेगळी रंगत आणत असून, मनोरंजनासोबतच प्रेक्षकांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण करणारा हा चित्रपट ठरेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महेश लिमये दिग्दर्शित aadi anant trailer  या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांनी लिहिले आहेत. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, रविंद्र औटी आणि दर्शन शाह सहनिर्माते आहेत. अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यासह सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले आणि गुरु ठाकूर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. ‘आदि अनंत’ हा चित्रपट येत्या १२ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.