अकोला,
peacock-poaching-case राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार केल्याप्रकरणी आकोट येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्र.१ ने आरोपी राजू सुखदेव इंदोरे याला दोषी ठरवून तीन वर्षांचा साधा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला आणखी चार महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. न्यायालयाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

या प्रकरणातील घटना एप्रिल २०१० मध्ये जऊळखेड परिसरात घडली होती. या भागात काही व्यक्ती शिकारीसाठी गेल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात गस्त घालून शोधमोहीम राबवली. या कारवाई दरम्यान आरोपी राजू सुखदेव इंदोरे याच्याकडून मृत मोर तसेच शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या काही वस्तू जप्त करण्यात आल्या.या प्रकरणी वन विभागाने गुन्हा नोंदवून तपास पूर्ण केला आणि न्यायालयात खटला दाखल केला. सुनावणीदरम्यान साक्षीदारांचे जबाब, जप्ती पंचनामा आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष आदी पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. या पुराव्यांच्या आधारे आरोपीने वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या कलम ९ चे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यानुसार, अधिनियमाच्या कलम ५१ अंतर्गत आरोपीला तीन वर्षांचा साधा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण
या प्रकरणाच्या कार्यवाहीत तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गणेशराव बोंडे, तत्कालीन वनरक्षक ज्ञानेश्वर चंद्रभान बुंदे, वनरक्षक गजानन ज्ञानदेव इंगळे, तसेच तपास अधिकारी रामराय महादेवराव खोपडे आणि महादेव मारुती वळादे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.सध्याचे अकोला उपवनसंरक्षक सुमंत एस. सोळंके (भा.व.से.) आणि सहाय्यक वनसंरक्षक नम्रता टाले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी बी. डी. कटारिया आणि वनपाल सुनील राऊत यांनी या प्रकरणातील कार्यवाही पार पाडली.