नवी दिल्ली,
gold-and-silver-will-the-prices-of-copper-also-rise सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण वाढत असतानाच आता तांब्याच्या दरातही मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या तांब्याची जागतिक मागणी वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत पुरवठा वाढवणे कठीण होत असल्याने भविष्यात तांब्याच्या किमती वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
‘गोल्डमॅन सॅक्स रिसर्च’च्या अहवालानुसार, तांब्याची नवीन खाण शोधण्यापासून ते तेथून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईपर्यंत सरासरी १६ वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो. त्यामुळे बाजारातील मागणी वाढली तरी तांब्याचा पुरवठा तातडीने वाढवणे शक्य होत नाही. त्यातच जुन्या खाणींमधील उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने भविष्यात पुरवठ्याचे संकट अधिक गंभीर होऊ शकते.
१९९० च्या दशकापासून तांब्याच्या मोठ्या नवीन खाणी शोधण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या दक्षिण अमेरिकेसह दुर्गम भागांमध्ये नवीन खाणींचा शोध घेतला जात आहे. मात्र, या ठिकाणी खनिजांमध्ये तांब्याचे प्रमाण कमी असल्याने उत्पादनासाठी अधिक मेहनत आणि खर्च करावा लागत आहे. प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमुळे खाणी उभारणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणेही अधिक खर्चिक ठरत आहे.
नवीन खाण उभारण्याच्या खर्चातही मोठी वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तांब्याच्या उत्पादनक्षमतेशी संबंधित सरासरी भांडवली खर्च प्रति टन १० हजार ६०० डॉलरवरून वाढून १५ हजार ९०० डॉलरपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच, सुरुवातीच्या अंदाजाच्या तुलनेत खर्चात सुमारे ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. काही प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष खर्च कंपन्यांच्या अंदाजापेक्षा २५ ते ९० टक्क्यांपर्यंत अधिक असल्याचेही समोर आले आहे.
तज्ज्ञांच्या मते, तांब्याच्या किमती वाढल्या तरी त्याचा परिणाम लगेच उत्पादनवाढीच्या स्वरूपात दिसणार नाही. आज नवीन खाणी आणि प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली, तरी त्यातून मिळणाऱ्या अतिरिक्त पुरवठ्याचा मोठा परिणाम २०४० च्या दशकात दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तांब्याच्या पुरवठ्याशी संबंधित अडचणी दीर्घकाळ कायम राहू शकतात.
दरम्यान, काही नवीन प्रकल्पांमुळे २०३५ पर्यंत दरवर्षी सुमारे १० लाख टन अतिरिक्त तांब्याचे उत्पादन होऊ शकते, असा अंदाजही अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे सुमारे २० अब्ज डॉलरची अतिरिक्त मूल्यनिर्मिती होण्याची शक्यता आहे. मात्र, वाढती जागतिक मागणी आणि नवीन खाणी सुरू करण्यासाठी लागणारा दीर्घ कालावधी पाहता, आगामी काळात तांब्याच्या किमतींवर दबाव कायम राहण्याची शक्यता आहे.