‘पुढील ३० वर्षे तुमचा नंबर लागणार नाही’

अमित शाह यांचा राहुल गांधींना टोला

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली
amit shah भारतीय जनता पक्षाचे बूथस्तरीय कार्यकर्ते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पक्षाचे कोट्यवधी कार्यकर्ते जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी, दुःख आणि वेदना समजून घेतात. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सातत्याने मेहनत करतात. याउलट, विरोधक केवळ आंदोलने आणि निदर्शनांवर भर देतात, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना, “पुढील ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागणार नाही. तुम्ही परदेशात असल्याने माझे म्हणणे ऐकू शकत नाही, याची मला जाणीव आहे,” अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला.
 

amit shah takes a swipe at rahul gandhi, says no chance for 30 years 
दिल्ली जल बोर्डाच्या (डीजेबी) एकूण ८,९४१ कोटी रुपये खर्चाच्या ४३ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. केवळ आंदोलने करून प्रश्न सुटत नाहीत, तर ज्या मतदारसंघातून निवडून आला आहात, तेथील नागरिकांच्या हितासाठी काम करणे आवश्यक आहे, असे त्यांनी विरोधकांना सुनावले. राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शाह म्हणाले की, ते सध्या परदेशात कुठेतरी असतील आणि त्यांना आपले म्हणणे ऐकू येत नसेल. ते दिल्लीत परतल्यानंतर आपला संदेश त्यांनी लक्षात ठेवावा; आगामी ३० वर्षांतही त्यांना सत्तेची संधी मिळणार नाही, असा दावा शाह यांनी केला.
 
 
यावेळी शाह यांनी यमुना नदीच्या स्वच्छतेचा मुद्दाही उपस्थित केला. काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर टीका करताना, या पक्षांनी अनेक वर्षे सत्ता उपभोगली, मात्र यमुना स्वच्छतेसाठी ठोस काम केले नाही, असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला यमुनोत्रीपासून प्रयागराजमधील संगमापर्यंत यमुना स्वच्छ करण्याचे श्रेय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष विविध कारणे पुढे करून जबाबदारी टाळत असल्याचेही शाह म्हणाले. अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे आहेत; मात्र पंजाबमधील त्यांचे सरकार सत्तेवरून गेल्यानंतरच ती दिली जातील, असे प्रत्युत्तरही त्यांनी दिले.
 
 
पंजाबच्या राजकारणावर amit shah  भाष्य करताना, राज्यातील जनतेने यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. तसेच राहुल गांधी घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी मतचोरीचे आरोप करत असल्याचा दावा त्यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये ५४ वर्षे, अरुणाचल प्रदेशात १२ वर्षे आणि दिल्लीत १८ वर्षे एकही निवडणूक जिंकता आलेली नाही, अशी आकडेवारी मांडत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. या वक्तव्यांतून शाह यांनी काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधण्याबरोबरच पंजाबमध्ये एनडीएच्या सत्तास्थापनेचा दावाही केला.