मुंबई
anita kanwal ज्येष्ठ अभिनेत्री अनीता कंवल या दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपटांमधील भूमिकांमुळे परिचित आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या आर्थिक अडचणीत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या वृत्तांवर अभिनेत्रीने तीव्र नाराजी व्यक्त करत आपली बाजू स्पष्ट केली आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीतील वक्तव्याचा विपर्यास करून आपल्याबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आपण कोणाकडेही आर्थिक मदत मागितलेली नसताना, आपली प्रतिमा मदतीची अपेक्षा करणारी व्यक्ती अशी रंगवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
अनीता कंवल यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ प्रसिद्ध करून या चर्चांमुळे होणारा मानसिक त्रास व्यक्त केला. पहाटे चार वाजले असतानाही आपल्याला नीट झोप लागत नसल्याचे सांगत, काही माध्यमांमधील बातम्यांमुळे मनस्ताप होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सहा महिन्यांपूर्वीच्या मुलाखतीत काम मिळाले नाही, तर आर्थिकदृष्ट्या किती काळ स्वतःचा खर्च भागवू शकाल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर आपण दीड वर्ष स्वतःला सांभाळू शकतो, असे उत्तर दिले होते. मात्र, या विधानाचा अर्थ आर्थिक मदतीची मागणी असा लावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपली भूमिका मांडताना अनीता कंवल यांनी अमिताभ बच्चन यांचे उदाहरण दिले. अमिताभ बच्चन यांनी यश चोप्रा यांच्याकडे काम मागताना आपल्याकडे काम नसल्याचे आणि आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याचे सांगितले होते, तेव्हा त्यावर अशा प्रकारची चर्चा झाली नव्हती, असे त्या म्हणाल्या. अभिनेत्रींबाबत मात्र लगेच गैरसमज पसरवले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आपण सधन आणि प्रतिष्ठित कुटुंबातून येत असून, आयुष्यात काही गुंतवणुकीचे निर्णय चुकीचे ठरले असले, तरी त्याचा अर्थ आर्थिक संकटात असल्याचा होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आजही कमावण्याची क्षमता असून, स्वतःचा खर्च पुढील दहा वर्षे भागवण्याचा आत्मविश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळत असल्याची माहितीही अनीता कंवल यांनी दिली. काही महिन्यांपूर्वी काम मिळत नसल्याची परिस्थिती होती; मात्र, त्यानंतर इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्यास सुरुवात केली आणि एका चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. आता सोशल मीडियावर सहकार्याच्या विविध संधी मिळत असल्याने आपण समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, कोणत्याही दूरचित्रवाणी वाहिनीचा किंवा ओटीटी मंचाचा आधार न घेता त्यांनी स्वतःचा २५ भागांचा रील ड्रामा तयार केला आहे. आपण आर्थिकदृष्ट्या अडचणीत नसून भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वयात आपली बदनामी होईल, अशा प्रकारची चुकीची माहिती प्रसारित करू नये, असे आवाहनही त्यांनी माध्यमांना केले.a