बिहार,
bihar double murder बिहारमधील नौगछिया पोलीस जिल्ह्यातील इस्माईलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ‘हटिया’ परिसरात गुरुवारी पहाटे दुहेरी हत्याकांड घडल्याने खळबळ उडाली आहे. चहा-नाश्त्याचे दुकान चालवणाऱ्या रंजन आणि त्यांच्या पत्नी किरण देवी यांची सशस्त्र हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संतप्त ग्रामस्थांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रंजन आणि किरण देवी दुकानात झोपलेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी रंजन यांच्यावर गोळीबार केला. पतीवर गोळी झाडल्याचे लक्षात येताच किरण देवी यांनी आरडाओरडा करत तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले आणि त्यांच्या डोळ्यांत अगदी जवळून दोन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस विविध शक्यता तपासून पाहत आहेत.
दरम्यान, या घटनेला आणखी एक गंभीर पैलू असल्याचे समोर आले आहे. रंजन यांच्या भावाची अडीच वर्षांची मुलगी पल्लवी कुमारी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. ती याच कुटुंबासोबत राहत होती. तिच्या बेपत्ता होण्याची माहिती कुटुंबीयांनी यापूर्वीच पोलिसांना दिली होती. मात्र, या प्रकरणात योग्य ती कारवाई झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दाम्पत्याच्या हत्येमुळे नागरिकांमधील संताप वाढला असून, चिमुकलीच्या बेपत्ता होण्याचा आणि दुहेरी हत्याकांडाचा परस्परांशी काही संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच इस्माईलपूर आणि गोपालपूर पोलीस ठाण्यांतील पथके घटनास्थळी दाखल झाली. सहाय्यक पोलीस अधीक्षक संयम रझा यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सुरुवातीला संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह हलवण्यास विरोध केला. मात्र, आरोपींना लवकरच अटक करण्याचे आणि बेपत्ता मुलीचा शोध घेण्याचे आश्वासन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही चित्रण आणि अन्य पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.