मुंबई
dhanush and mammootty धनुष आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ममूटी यांच्या आगामी ‘ओम : चैप्टर 1 : उधिरम – द ब्लड वुड’ या चित्रपटातील ‘वीझा वीरा’ हे दुसरे गाणे प्रदर्शित झाले आहे. संगीतकार साई अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याच्या थीमला महिनाभरापूर्वीच प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे संपूर्ण गाण्याबद्दलची उत्सुकता वाढली होती. आता पूर्ण गाणे प्रदर्शित झाल्याने चित्रपटाच्या संगीतप्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
धनुषच्या वाढदिवशी प्रदर्शित झालेल्या ‘अलाका लूवा’ या पहिल्या गाण्याने चित्रपटाच्या संगीतप्रवासाची सुरुवात झाली होती. आकर्षक ठेका आणि उत्साहपूर्ण संगीतामुळे या गाण्याने सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवली होती. बराच काळ ते ट्रेंडिंगमध्येही राहिले. पहिल्या गाण्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता ‘वीझा वीरा’च्या माध्यमातून निर्माते प्रेक्षकांना पुन्हा एकदा संगीताची नवी अनुभूती देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
साई अभ्यंकर यांच्या दमदार संगीताने सजलेल्या ‘वीझा वीरा’मध्ये जोशपूर्ण बीट्स आणि ऊर्जेचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो. गाण्याची लय श्रोत्यांना ठेका धरायला भाग पाडणारी असून, त्यातून चित्रपटाच्या भव्य दृश्यविश्वाचीही झलक मिळते. दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी यांनी साकारलेले हे सिनेमॅटिक विश्व मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांसाठी खास अनुभव ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या गाण्याविषयी बोलताना आरटेक स्टुडिओजच्या संस्थापक आणि चित्रपटाच्या निर्मात्या श्रद्धा अग्रवाल म्हणाल्या की, ‘अलाका लूवा’ला मिळालेले प्रेम आणि त्याचे दीर्घकाळ ट्रेंडिंगमध्ये राहणे निर्मात्यांसाठी आनंददायी होते. ‘वीझा वीरा’ची थीम प्रदर्शित केल्यानंतर प्रेक्षकांनी दाखवलेला उत्साह पाहून त्यांना संपूर्ण गाण्याची प्रतीक्षा असल्याचे स्पष्ट झाले. प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी पूर्ण गाणे प्रदर्शित करताना आनंद होत असून, साई अभ्यंकर यांनी अतिशय वेगळे आणि उत्साहपूर्ण संगीत दिले आहे. या गाण्यालाही प्रेक्षकांकडून पहिल्या गाण्याइतके, किंबहुना त्याहून अधिक प्रेम मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
राजकुमार पेरियासामी दिग्दर्शित या चित्रपटात धनुष आणि ममूटी यांच्यासह साई पल्लवी, श्रीलीला, नसीरुद्दीन शाह आणि इंद्रन्स हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. आरटेक स्टुडिओज प्रस्तुत आणि वंडरबार फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. श्रद्धा अग्रवाल, धनुष आणि अजमत जगमग हे निर्माते असून, श्रेयस श्रीनिवासन आणि संदेश अग्रवाल सहनिर्माते आहेत. विशु रामास्वामी यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून काम पाहिले आहे.
‘अलाका लूवा’नंतर ‘वीझा वीरा’लाही मिळणारा प्रतिसाद चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा ठरत आहे. संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जोड निर्माण करणारा हा बहुभाषिक चित्रपट येत्या २० नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरातील सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.