मुंबई
dhasal teaser विद्रोही कविता, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा आक्रमक आवाज आणि दलित पँथर चळवळीचा संघर्षमय इतिहास अशी ओळख असलेल्या पद्मश्री नामदेव ढसाळ यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘ढसाळ’ या बहुप्रतीक्षित चरित्रपटाचा टीझर नागपूर येथे आयोजित धम्मा फेस्टिव्हलच्या भव्य व्यासपीठावर प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता ललित प्रभाकर याने साकारलेल्या नामदेव ढसाळ यांच्या भूमिकेची झलक या टीझरमधून समोर आली असून, चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.
आपल्या बंडखोर विचारांनी, परखड लेखणीने आणि सामाजिक वास्तवाचे निर्भीड चित्रण करणाऱ्या कवितांनी मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र स्थान निर्माण करणारे नामदेव ढसाळ हे केवळ कवी नव्हते, तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे प्रभावी विचारवंत होते. त्यांच्या संघर्षमय आयुष्याचा, सामाजिक विषमतेविरुद्धच्या भूमिकेचा आणि विद्रोही विचारांचा वेध या चित्रपटातून घेतला जाणार आहे. ढसाळ यांचे व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकारण्यासाठी ललित प्रभाकरने घेतलेली मेहनत आणि त्याचा या भूमिकेतील लूक यामुळे चित्रपटाकडे लक्ष वेधले गेले आहे.
संजय पांडेय आणि दि बायोस्कोप फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती वरुणा मदनलाल राणा आणि संजय पांडेय यांनी केली आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. नामदेव ढसाळ यांचे विचार, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि अन्यायकारक सामाजिक व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची त्यांची निर्भीड वृत्ती प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
दिग्दर्शिका वरुणा dhasal teaser मदनलाल राणा यांनी सांगितले की, नामदेव ढसाळ यांचे व्यक्तिमत्त्व समजून घेणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचा जीवनप्रवास जाणून घेणे नव्हे. त्यांच्या विचारांमागील अस्वस्थता, विद्रोह आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या चित्रपटाच्या तयारीसाठी त्यांच्या जीवनाचा आणि साहित्याचा अनेक वर्षे अभ्यास करण्यात आला. त्यांचा संघर्ष आणि विचारांची धार पडद्यावर प्रामाणिकपणे साकारण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धम्मा फेस्टिव्हलसारख्या महत्त्वाच्या व्यासपीठावर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणे ही आनंदाची बाब असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
निर्माते संजय पांडेय यांनी नामदेव ढसाळ dhasal teaser यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या शब्दांमधील आक्रमकता आणि विचारांमधील विद्रोहाने अनेक पिढ्यांना प्रभावित केले आहे. अशा व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट साकारताना अभिमानासोबत मोठी जबाबदारीही असल्याचे त्यांनी नमूद केले. नव्या पिढीला ढसाळ यांच्या विचारांशी जोडणे, त्यांचा संघर्ष आणि साहित्यिक योगदान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे, हा चित्रपटामागील मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.
या चरित्रपटाला ज्येष्ठ दाक्षिणात्य संगीतकार इलैयाराजा यांचे संगीत लाभले आहे. इर्शाद कामील आणि गुरु ठाकूर यांनी गीते लिहिली असून, आदर्श शिंदे, दिव्य कुमार, रोहित राऊत, पद्मनाभ गायकवाड, उर्मिला धनगर आणि विभावरी आपटे यांनी गाण्यांना स्वर दिला आहे. अभय सोडये, प्रताप गंगावणे आणि अश्वजीत कांबळे यांनी संवादलेखन केले आहे. ललित प्रभाकरचा नामदेव ढसाळ यांच्या रूपातील लूक रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी साकारला आहे. एकनाथ कदम यांनी कला दिग्दर्शन, तर मिलिंद जोग यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे. नामदेव ढसाळ यांच्या विचारांचा वारसा आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने ‘ढसाळ’ हा चित्रपट महत्त्वाचा ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चित्रपट एप्रिल २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.