दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समिती सभा

वाशीम,
district-collector-yogesh-kumbhejkar दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर, पशुधन आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. संबंधित विभागांनी प्रलंबित अनुपालन अहवाल तातडीने सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली २१ ऑटोबर रोजी जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
district-collector-yogesh-kumbhejkar
 
जिल्हाधिकारी कुंभेजकर पुढे बोलतांना म्हणाले, शेतकर्‍यांना जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जवसुलीस स्थगिती आणि कृषिपंपांच्या वीजबिलात सवलत देण्यासंदर्भातील तातडीने कार्यवाही करावी.रोजगार हमी योजनेअंतर्गत अधिकाधिक सार्वजनिक कामे सुरू करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.सर्व ग्रामपंचायतींमध्ये सार्वजनिक कामे सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिल्या. पाणीटंचाईच्या संभाव्य परिस्थितीचा विचार करून जिल्ह्याचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तातडीने सादर करण्याचे निर्देश ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले. सद्यस्थितीत टँकरचे प्रस्ताव प्राप्त झाले नसले, तरी पुढील काळात गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता भासू शकते, पाणी आणि पशुधनासाठी पाण्याचे नियोजन करण्याबाबतही संबंधित यंत्रणांना निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी दिले.
 
 
रब्बी हंगामासाठी चारा उत्पादन वाढविणे, शेतकर्‍यांना वैरण बियाणे उपलब्ध करून देणे आणि चारा लागवडीची कामे सुरू करावे. वनक्षेत्रातील चार्‍याचे संकलन, साठवणूक, वाहतूक व वितरण यांचे सूक्ष्म नियोजन करावे. तसेच जलसंधारणाची कामे, पाणी आरक्षणाचे प्रस्ताव आणि जलस्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठ्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.दुष्काळी परिस्थितीत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीसह शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची उपलब्धता आणि टंचाईग्रस्त गावांतील कृषिपंपांची वीजजोडणी खंडित न करण्यासंदर्भातील उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांनी शासनाच्या निर्देशांनुसार आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करून कार्यवाहीचे अद्ययावत अहवाल सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले. संबंधित यंत्रणाप्रमुखांची उपस्थिती होती.