तळेगाव (श्या.पं.),
doctors-strike-in-the-district पोलिसांनी तपासणीसाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलेल्या आरोपीने चक्क महिला वैद्यकीय अधिकार्याच्या कानशिलात मारून अश्लील शिवीगाळ केली. हा संतापजनक प्रकार पोलिसांच्या डोळ्यादेखत घडल्याने आरोग्य केंद्रात मोठा तणाव निर्माण झाला. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी यांनी सहकार्यांसह तात्काळ पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही घटना २१ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेच्या निषेधार्थ आज गुरुवारी जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी व कर्मचार्यांनी निषेध नोंदवून जिल्हाधिकारी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी सायंकाळी पोलिसांनी आरोपी कदीर अली रज्जाक अली रा. तळेगाव याला वैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. आरोपीसोबत दोन पोलिस व तीन गृहरक्षक दलाचे सैनिक होते. मद्यधुंद आरोपी कदीर अली याची तपासणी सुरू असतानाच महिला वैद्यकीय अधिकार्यावर त्याने अचानक हल्ला केला तसेच अश्लील शिवीगाळ केली. पोलिसांनी आरोपीला ओपीडीमधून बाहेर आणले त्यावेळीसुद्धा तो डॉक्टरला अश्लील शिवीगाळ करीतच सुटला होता. घटनेची माहिती कळल्यानंतर सर्वांनी संताप व्यक्त करीत आरोग्य कर्मचार्यांनी पोलिस ठाणे गाठून निषेध नोंदवून तक्रार दाखल केली.
कामावरच बहिष्कार
वर्धा : तळेगाव (श्या. पंत.) येथे कर्तव्यावर असलेल्या महिला वैद्यकीय अधिकार्यांना वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने मारहाण केली. या घटनेचा महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघाच्या वतीने गुरुवारी निषेध नोंदविला. वैद्यकीय अधिकार्यांनी कामावरच बहिष्कार टाकला. आंदोलनकत्र्या डॉक्टरांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी वान्मथी सी., जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण आणि पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांना सादर केले. आरोपीवर कठोर कारवाई करावी, पोलिसांनी पाहिजे ती खबरदारी घेतली नाही त्यामुळे या प्रकरणात संबंधित पोलिस कर्मचारीही तितकेच दोषी असल्याने त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी. भविष्यात पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात यावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. निवेदन देताना डॉ. भागवत राऊत, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, डॉ. अजय बुजाडे, डॉ. विशाल रुईकर, डॉ. मनोज नाकाडे, डॉ. प्रफुल्ल गोरडे, डॉ. वैशाली थेस्कर, डॉ. मनिषा लोंदे, डॉ. दीपक वाघमारे आदींची उपस्थिती होती.