७ मतदान केंद्रांवर ३,७१५ मतदार बजावणार मतदानाचा हक्क !

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
वाशीम,
election-process जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात एकूण सात मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, या केंद्रांवर ३ हजार ७१५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मतदान कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
 
election-process
 
जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांमध्ये वाशीम तहसील कार्यालयातील सभागृह, वाशीम तहसील कार्यालयाचा पुरवठा विभाग, मंगरूळनाथ तहसील कार्यालय, रिसोड तहसील कार्यालय, मालेगाव तहसील कार्यालय, कारंजा तहसील कार्यालय आणि मानोरा तहसील कार्यालयाचा समावेश आहे. या सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण ३ हजार ७१५ मतदारांमध्ये २ हजार ८९४ पुरुष आणि ८२१ महिला मतदारांचा समावेश आहे. रिसोड येथे सर्वाधिक ७७० मतदारांची नोंद असून, कारंजा येथे ६९४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वाशीम तहसील कार्यालयातील सभागृहात ५३०, तर पुरवठा विभागात ५२९ मतदार आहेत. मंगरूळनाथ येथे ४७२, मालेगाव येथे ४१५ आणि मानोरा येथे ३०५ मतदारांची नोंद करण्यात आली आहे.
 
 
मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी सात मतदान केंद्राध्यक्ष, प्रत्येकी सात प्रथम, द्वितीय व तृतीय मतदान अधिकारी तसेच १० टक्के राखीव कर्मचार्‍यांसह एकूण २७ कर्मचार्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान कर्मचार्‍यांचे १२ आणि १६ ऑटोबर रोजी प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले असून, तिसरे प्रशिक्षण २२ ऑटोबर रोजी पार पडले. निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्ह्यात तीन क्षेत्रीय अधिकारी, सहा भरारी पथके, नऊ सूक्ष्म निरीक्षक आणि नऊ मतदान पथके नियुक्त करण्यात आली आहेत. याशिवाय, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १५ पोलिस अधिकारी, २२८ पोलिस अंमलदार आणि १४ होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
 
 
मतदान प्रक्रियेतील सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखून मतदान शांततेत, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे. मतदान केंद्रांवरील व्यवस्था, कर्मचारी नियोजन आणि सुरक्षा बंदोबस्त पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी केली असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.