गुजरात
gujarat pregnant woman death गुजरातमधील खेडा जिल्ह्यात गर्भवती महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तिचा पती आणि दीर यांना ताब्यात घेतले आहे. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या द्रवरूप नॅनो युरियाचे जबरदस्तीने सेवन करायला लावून महिलेची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. महुधा येथे ही घटना घडली असून, अरुणाबेन असे मृत महिलेचे नाव आहे. सुरुवातीला तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तपास आणि शवविच्छेदन अहवालातून तिचा मृत्यू विषारी पदार्थाच्या सेवनामुळे झाल्याचे समोर आल्याचे वृत्त आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अरुणाबेनचा पती मितुल सोढा आणि दीर विपुल सोढा यांना ताब्यात घेतले आहे. तिचा भाऊ विरेंद्रसिंह याने दिलेल्या तक्रारीनंतर तपासाला सुरुवात झाली. पती मितुल, सासू कैलाशबेन, दीर विपुल आणि नणंद अल्पाबेन यांच्याकडून अरुणाबेनचा शारीरिक तसेच मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तिच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे कुटुंबात वारंवार वाद होत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, घटनेच्या रात्री अरुणाबेन आणि तिचा पती मितुल यांच्यात जोरदार वाद झाला होता. त्यानंतर मितुलने पत्नीने आत्महत्या केल्यास पतीची कायदेशीर जबाबदारी काय असते, याबाबत इंटरनेटवर माहिती शोधल्याचे तपासात आढळल्याचे सांगण्यात येते. यानंतर त्याने अरुणाबेनला सोफ्यावर जबरदस्तीने धरून तिच्या तोंडात द्रवरूप नॅनो युरिया ओतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या कथित प्रकारात कुटुंबातील इतर सदस्यांचाही सहभाग होता का, याचा तपास सुरू आहे. अरुणाबेनचे पाय नणंद अल्पाबेनने, तर हात सासू कैलाशबेनने धरल्याचा आरोप आहे. या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलीस जबाब आणि उपलब्ध पुराव्यांची पडताळणी करत आहेत.
अरुणाबेनच्या मृत्यूनंतर हा प्रकार आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही पोलिसांना संशय आहे. घराच्या मागील बाजूच्या खोलीत खिडकीजवळ नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने तिचा मृतदेह लटकवण्यात आल्याचे तपासात समोर येत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर मृतदेह खाली उतरवून घटनाक्रमाबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नॅनो युरिया असलेली प्लास्टिकची पिशवी घरातील चुलीत जाळण्यात आल्याचेही तपासात आढळल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत उघड होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून नायलॉनची दोरी, मोबाइल फोन, ब्लेड आणि अन्य वस्तू जप्त केल्या आहेत. अरुणाबेनचा मृत्यू आत्महत्या असल्याचे भासवण्यासाठी आणखी कोणाची मदत घेण्यात आली होती का, तसेच कुटुंबातील इतर सदस्यांची या घटनेतील भूमिका काय होती, याचा शोध घेतला जात आहे. मृत्यूपूर्वी तिचा छळ झाल्याच्या आरोपांचाही तपास केला जात आहे. तक्रारीतील आरोप, जप्त केलेले साहित्य आणि घटनाक्रम यांची पडताळणी करून संबंधितांची भूमिका निश्चित करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, आरोपांची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.