शेताची राखण करण्यासाठी गेलेल्या युवकाचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू

तिरोडा तालुक्यातील चांदोरी बुज येथील घटना

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
गोंदिया,
chandori-budruk-in-tiroda-taluka शेतातील पिकांची राखण करण्यासाठी रात्री घराबाहेर पडलेल्या २२ वर्षीय तरुणाचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. प्रेम अशोक काटवले (२२), रा. चांदोरी बुज, ता. तिरोडा, असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी २२ ऑक्टोबर सकाळी ही घटना उघडकीस आली.
 
 
chandori-budruk-in-tiroda-taluka
 
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम हा नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री शेतातील पिकांची राखण करण्यासाठी गेला होता. मात्र, रात्र उलटून पहाट झाली तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली. त्यांनी शेताकडे जाऊन शोध घेतला असता, शेताजवळील वैनगंगा नदीच्या काठावर प्रेमच्या चपला आढळून आल्या. याबाबत गावात माहिती पसरताच ग्रामस्थांनी नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. यावेळी नदीच्या पाण्यात प्रेमचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
 
 
शेताकडे जाताना पाय घसरून तो नदीत पडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिस ठाण्याचे हवालदार ब्रिजेश मडावी आणि पोलिस शिपाई किसन डहारे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. तरुणाच्या अकाली मृत्यूमुळे काटवले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे.