नागोया
indian para swimmer जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेदरम्यान भारतीय पॅरा जलतरणपटू मोहम्मद शम्स आलम शेख याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भारतीय जलतरण संघ वास्तव्यास असलेल्या हॉटेलमधील एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप या ४० वर्षीय खेळाडूवर आहे. या प्रकरणानंतर जपानी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला भारतात परत पाठवण्यात आले. या घटनेची गंभीर दखल घेत पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया (PCI) यांनी त्याच्यावर आजीवन बंदी घालण्याची शिफारस केल्याची माहिती गुरुवारी दिली.
या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करताना पॅरालिम्पिक कमिटीने लैंगिक गैरवर्तन आणि कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिष्ठेला, सुरक्षिततेला किंवा अधिकारांना बाधा आणणाऱ्या कृत्यांविरोधात कठोर भूमिका असल्याचे सांगितले. अशा प्रकारांबाबत संस्थेचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. भारतीय क्रीडा पथकातील प्रत्येक खेळाडू आणि सदस्याने शिस्त, क्रीडाभावना तसेच आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक असल्याचे समितीने नमूद केले.
आशियाई पॅरा स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी खेळाडू आणि पथकातील सदस्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या, वर्तन आणि शिस्तीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी विशेष वेबिनार आयोजित करण्यात आला होता. या माध्यमातून सर्वांना आवश्यक सूचना आणि प्रशिक्षण देण्यात आले होते, असेही पीसीआयने आपल्या निवेदनात स्पष्ट केले.
या गंभीर प्रकरणात भारतीय क्रीडा पथकाचे शेफ डी मिशन यांनी संबंधित खेळाडूविरोधात कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याची भूमिका घेतली असून, त्याच्यावर जन्मभरासाठी बंदी घालण्याची शिफारस केली आहे. सध्या त्याला जपानमधून भारतात परत पाठवण्यात आले आहे. आशियाई पॅरा स्पर्धा संपल्यानंतर प्रचलित नियम आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार संबंधित सक्षम प्राधिकरणांकडून पुढील कारवाई केली जाईल, असे पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मोहम्मद शम्स आलम शेख याची यापूर्वीची क्रीडा कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. २०१८ मधील आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत त्याने ५० मीटर आणि २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारांत सुवर्णपदके जिंकली होती. तसेच १०० मीटर बटरफ्लाय (S5) आणि ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक (SB4) या प्रकारांतही त्याने जागतिक विजेतेपद मिळवले होते.
मात्र, यंदाच्या आशियाई पॅरा स्पर्धेत आपल्या पहिल्या शर्यतीत सहभागी होण्यापूर्वीच त्याच्यावर हे गंभीर आरोप झाले. त्यामुळे त्याच्या क्रीडा कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आजीवन बंदीच्या शिफारशीवर अंतिम निर्णय आणि संबंधित कायदेशीर प्रक्रियेनंतरच या प्रकरणातील पुढील घडामोडी स्पष्ट होणार आहेत.