हळद पीक वाचविण्यासाठी अखंडित वीज पुरवठा देण्यात यावा

जिल्हाधिकार्‍यांना इंझोरीच्या शेतकर्‍यांचे निवेदन

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
मानोरा,
district-collector मानोरा तालुयातील इंझोरी या गावातील शेतकर्‍यांनी मोठा खर्च करून लावलेली हळदीची पिके सिंचनाअभावी सुकण्याच्या मार्गावर असून ही पिके वाचविण्यासाठी सुरळीत वीज पुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी वाशीम यांना शेतकर्‍यांच्या वतीने देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आम्ही खरीप हंगामामध्ये हळद पिकाची लागवड केली असून, मोठ्या आशेने एकरी २ लाख रुपये आतापर्यंत खर्च केला आहे.
 
district-collector
 
अगोदरच आमचे सोयाबीन व कपाशीचे पीक गेलेले असताना हळदीला आम्ही आमच्याजवळ होती नव्हती ती पुंजी लावली. परंतु आता अडाण प्रकल्पावरील आज आमची वीज तोडली असल्यामुळे आमचे हळदीचे पीक पूर्ण सुकणार असल्याचे नमूद केले आहे. एकीकडे निसर्ग व दुसरीकडे शासन शेतकर्‍यांच्या पाठीमागे लागले आहे. यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार आहे. म्हणून आपण आमच्या हळद पिक जगण्यापुरते पाणी मिळेल यासाठी आपल्या स्तरावर आमची रास्त मागणी पूर्ण करावी, अन्यथा आम्हाला कुटुंबासह आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
 
या निवेदनावर शेतकरी जगदीश आरेकर, बापूराव काळेकर, सुभाष अलाटे, मंगेश पवार, पंकज भालेकर, योगेश हळदे, सुभम पवार, अशोक आगरकर, गजानन अहमदाबादकर यांच्यासह अनेक शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. अडाण प्रकल्पाच्या वीज पुरवठ्यातील बिघाडामुळे खरीप हंगामातील लाखो रुपयांची हळद पिके डोळ्यादेखत सुकत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून , प्रशासनाने तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.