वर्धा,
national-association-for-the-blind राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या वतीने पहिले राज्यस्तरीय जागृत दृष्टी साहित्य संमेलनाचे आयोजन २४ व २५ ऑटोबर रोजी स्थानिक अनेकान्त स्वाध्याय मंदिर सभागृहात करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्रचे राज्य अध्यक्ष भोजराज पाटील यांनी आज गुरुवार २२ रोजी स्थानिक अनेकान्त स्वाध्याय मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. भोजराज पाटील पुढे म्हणाले, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ ५० वर्षांपासून अंध व्यतींच्या शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन तसेच त्यांच्या सामाजिक व कौटुंबीक जीवनाच्या उन्नतीकरिता कार्यरत असून याच अनुषंगाने अंध व्यतींचा साहित्यविश्वाशी संपर्क वाढावा आणि मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची संधी प्राप्त व्हावी, यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले.
संमेलनाचे उद्घाटन २४ रोजी सकाळी १० वाजता पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते होईल. यावेळी संमेलनाध्यक्ष कवी व लेखक संजय इंगळे तिगावकर, केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कृत मनोवैज्ञानिक प्रा. डॉ. विनोद आसुदानी, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप दाते, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे राज्याध्यक्ष तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष भोजराज पाटील उपस्थित राहतील. याचवेळी ब्रेल पुस्तक व जागृती दीपावली विशेषांगाचे प्रकाशन करण्यात येईल.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात दुपारी १२ वाजता ‘तमाच्या तळाशी दिवे लागले’ या प्रा. शैला देशपांडे यांचे आत्मकथन असलेल्या व सुषमा देशपांडे-मुलमुले यांनी शब्दबद्ध केलेल्या ब्रेल-पुस्तकावर परिसंवाद होईल. या परिसंवादात विनिता हिंगे व भावना खरे विचार मांडतील. द्बितीय सत्रात दुपारी ३ वाजता कथाकथनाच्या अध्यक्षस्थानी घनश्याम आसुदानी राहणार असून प्रभाकर कदम, रेवानंद मेश्राम, प्रा. मीनल रोहणकर, साधना उमाळकर, प्रा. डॉ. सुचिता ठाकरे, सुषमा पाखरे, प्रा. अभिजित डाखोरे हे कथा सादर करतील.
सायंकाळी ६ वाजता काशिनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक कविसंमेलन आयोजित असून या काव्यसंध्येत प्रकाश पंडागळे, ज्ञानेश्वर वर्हाडे, नरेंद्र ताकसांडे, छत्रपाल तामगाडगे, सुरेश वंजारी, सूर्यकांत मुनघाटे आदी कवींचा सहभाग राहणार आहे.
रविवार २५ रोजी सकाळी १० वाजता सिनेनाट्य, दिग्दर्शक तथा नाम फाउंडेशनचे समन्वयक हरीश इथापे ‘मन, मेंदूला अनलॉक करू या’ या विषयावर संवाद साधतील. सकाळी ११ वाजता सूरसंगम गीतगुंजन हा कार्यक्रम होईल. संमेलनाचा समारोप दुपारी १२ वाजता पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, संजय इंगळे तिगावकर, ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. विनोद अदलखिया, अॅड. दिनेश शर्मा, भोजराज पाटील यांच्या उपस्थितीत होईल, अशी माहितीही भोजराज पाटील यांनी दिली. पत्रकार परिषदेला संजय इंगळे तिगावकर, संमेलन समन्वयक नरेंद्र नरोटे यांची उपस्थिती होती.