पाण्याचे पुढील आठ महिन्यांचे नियोजन करा

सुपर अल निनो व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांचे निर्देश

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
गोंदिया,
plan-for-water-usage सुपर अल निनो आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी तसेच रब्बी हंगामासाठी शेतीचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी पुढील आठ महिन्यांचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले. टंचाई निवारणार्थ उपाययोजना व त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात २१ ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन भवनात पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर, खा.राजेंद्र जैन, आ. राजकुमार बडोले, आ. विनोद अग्रवाल, आ.विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी मंदार पत्की, मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित चंद्रा दोंतुला, पोलिस अधीक्षक गोरख भामरे, उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 
 
plan-for-water-usage
  
दरम्यान, भूजल पातळीचा विचार करून नवीन बोअरवेलला परवानगी देऊ नये, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री नाईक यांनी दिल्या. उपलब्ध पाण्याचा सुयोग्य वापर करणे आवश्यक असून, नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नाले व तलाव खोलीकरण तसेच जलसंधारणाची कामे हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. जलसंधारणाची कामे सुरू करण्यापूर्वी संबंधित लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचे सहकार्य घ्यावे, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी तसेच नगरपंचायत क्षेत्रातील पाणीटंचाईच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पुढील आठ महिन्यांसाठी पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्व मोठे व मध्यम प्रकल्प, त्यातील सद्यस्थितीतील पाणीसाठा तसेच आरक्षित पाण्याची माहिती पालकमंत्र्यांनी जाणून घेतली. रब्बी हंगामासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होईल, याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले. इटियाडोह प्रकल्प, धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प, गोंदिया पाटबंधारे विभागांतर्गत येणारे प्रकल्प तसेच कटंगी मध्यम प्रकल्प यातील पाणीसाठा व आरक्षित पाण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
 
बोदलकसा धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन
बोदलकसा धरणातील पाळ तुटल्यामुळे पाणी वाहून गेले असून, यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तीय हानी झाली नसली तरी धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. आगामी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे आणि धरणाचे आवश्यक काम पूर्ण करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. पाणीटंचाई तसेच कीडरोगामुळे पिकांचे नुकसान झाले असल्यास त्याचे योग्य पद्धतीने पंचनामे करावेत, असे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.