दलेर मेहंदींच्या समर्थनार्थ राखी सावंत, सुदेश बेरी मैदानात

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
उत्तराखंड
rakhi sawant उत्तराखंडमधील टिहरी येथे आयोजित कुंजापुरी पर्यटन आणि विकास मेळ्यातील सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान गायक दलेर मेहंदी यांच्याबाबत झालेल्या वादाचे पडसाद मनोरंजनविश्वात उमटू लागले आहेत. कार्यक्रमातील सादरीकरणावरून उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल यांनी गायकावर नाराजी व्यक्त करत त्यांना व्यासपीठावरच सुनावले होते. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. गायक मीका सिंह यांनी यापूर्वीच दलेर मेहंदी यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली होती. आता अभिनेत्री राखी सावंत आणि अभिनेते सुदेश बेरी यांनीही गायकाच्या बाजूने आवाज उठवला आहे.
 

rakhi sawant and sudesh berry support daler mehndi amid kunjapuri mela controversy 
राखी सावंत यांनी समाजमाध्यमांवर व्हिडीओ शेअर करत कलाकारांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्यानंतर त्यांचा सन्मान राखणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. दलेर मेहंदी यांना आपण अनेक वर्षांपासून ओळखत असून त्यांच्यासोबत कामही केले आहे, असे सांगत त्यांनी त्यांच्याशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे नमूद केले. दलेर मेहंदी यांनी कधीही मद्यपान केलेले नसल्याचा दावा करत, वाढत्या वयामुळे कलाकाराला काही शारीरिक त्रास होऊ शकतात, असे त्या म्हणाल्या. अशा परिस्थितीत प्रकृतीची अडचण समजून घेण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी कलाकाराचा अपमान करणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अभिनेते सुदेश बेरी यांनीही व्हिडीओच्या माध्यमातून दलेर मेहंदी यांना पाठिंबा दर्शवला. कलाकाराच्या सन्मानाबरोबरच त्याच्या भावना आणि प्रतिष्ठेची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. दलेर मेहंदी यांनी गेल्या दशकाहून अधिक काळ आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने आणि संगीताने लाखो चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. एखाद्या कलाकाराला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागते, त्यामुळे त्याच्या योगदानाचा आणि भावनांचा आदर राखला पाहिजे, असे बेरी यांनी स्पष्ट केले.
कलाकाराच्या सादरीकरणाबाबत rakhi sawant  तक्रार किंवा मतभेद असू शकतात; मात्र, सार्वजनिक व्यासपीठावर त्याला अपमानास्पद वागणूक देणे योग्य नाही, असेही सुदेश बेरी यांनी नमूद केले. कोणताही प्रश्न निष्पक्षपणे, संवेदनशीलतेने आणि परस्पर सन्मान राखून सोडवता येतो, असे सांगत त्यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. अपमानाऐवजी आदर आणि आरोप-प्रत्यारोपांऐवजी संवादाला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले.दरम्यान, नरेंद्रनगर येथे झालेल्या कुंजापुरी पर्यटन आणि विकास मेळ्यातील कार्यक्रमात दलेर मेहंदी यांच्या गायनावरून वाद निर्माण झाला होता. काही गाण्यांच्या सादरीकरणावेळी त्यांच्या प्रत्यक्ष आवाजाऐवजी ध्वनिमुद्रित ट्रॅक ऐकू येत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मंत्री सुबोध उनियाल व्यासपीठावर आले आणि त्यांनी गायकाला जाब विचारल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.
या घटनेनंतर दलेर मेहंदी यांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचे स्पष्ट केले होते. कार्यक्रमादरम्यान तब्येत बिघडल्यामुळे काही भागांत ध्वनिमुद्रित ट्रॅकचा आधार घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले. या स्पष्टीकरणानंतरही वाद सुरू असून, कलाकाराचा सन्मान आणि सार्वजनिक कार्यक्रमांतील वर्तन यांवरून मनोरंजनविश्वात चर्चा रंगली आहे.