थिएटरनंतर ‘रामायण’ जिओहॉटस्टारवर

पे-पर-व्ह्यूद्वारे पाहता येणार

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
मुंबई
ranbir kapoor रणबीर कपूर अभिनीत आणि नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण : पार्ट १’ या बहुचर्चित चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर ५ नोव्हेंबर २०२६ रोजी हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून, त्यानंतर तो जिओहॉटस्टारवर उपलब्ध होईल. विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी प्रेक्षकांना पे-पर-व्ह्यू सुविधेचा पर्याय दिला जाणार आहे. जिओहॉटस्टारवर स्वतंत्र शुल्क भरून चित्रपट पाहण्याची सुविधा प्रथमच उपलब्ध करून दिली जात असल्याचे सांगितले जात आहे.
 

ranbir kapoor ramayana ott release on jiohotstar: pay-per-view details 
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असताना त्याच्या आगाऊ तिकीटविक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. दसऱ्याच्या दिवशी सुरू झालेल्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चित्रपटाने लक्ष वेधले आहे. हा चित्रपट आयमॅक्स 3D स्वरूपातही प्रदर्शित होणार आहे. चित्रपटगृहांमधील प्रदर्शनाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर भारतातील प्रेक्षकांना तो जिओहॉटस्टारवर पाहता येईल.
जिओस्टारच्या अध्यक्षा नीता मुकेश अंबानी यांनी या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्त केला. रामायण ही भारताच्या महान सांस्कृतिक वारशांपैकी एक असून, या कथेनं अनेक शतकांपासून भारतीयांच्या विचारविश्वाला आकार दिला आहे, असे त्यांनी नमूद केले. या महाकाव्याने पिढ्यान्पिढ्या लोकांच्या कल्पनाशक्तीला प्रेरणा दिली असून जीवनाला दिशाही दिली आहे. भारत कथाकथनाच्या नव्या पर्वात प्रवेश करत असताना सांस्कृतिक वारसा अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्याच्या संधी वाढत आहेत, असेही त्या म्हणाल्या. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयापर्यंत कथा पोहोचवणे हे जिओहॉटस्टारचे उद्दिष्ट असल्याचे सांगत, ‘रामायण’सारखी भव्य कलाकृती देशातील कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणे हा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. प्राइम फोकस स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटासाठी व्हिज्युअल इफेक्ट्स क्षेत्रातील DNEG आणि कन्नड अभिनेता यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांनी सहकार्य केले आहे. वाल्मिकी रामायणावर आधारित या चित्रपटाची पटकथा श्रीधर राघवन यांनी लिहिली आहे.चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम, साई पल्लवी सीता, यश रावण, सनी देओल हनुमान, तर रवी दुबे लक्ष्मण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अरुण गोविल, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंह, विवेक ओबेरॉय, कुणाल कपूर आणि काजल अग्रवाल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. भव्य निर्मिती, प्रभावी दृश्यरचना आणि लोकप्रिय कलाकारांची फळी यामुळे ‘रामायण’च्या प्रदर्शनाकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.