खुशखबर...उत्कृष्ट प्रतीच्या धानाला ४,७०० रुपयांपर्यंत भाव!

आतापर्यंतच्या इतिहासात उच्चांक: तिरोडा बाजार समितीत धानाच्या दरात तेजी

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
गोंदिया,
tiroda-agricultural-produce-market आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तांदळाला असलेली मागणी आणि उत्कृष्ट प्रतीच्या धानाला मिळणारा प्रतिसाद यामुळे धान उत्पादक शेतकर्‍यांच्या आशा उंचावल्या आहेत. जिल्ह्यातील तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २१ ऑक्टोबरच्या बाजारभाव पत्रकानुसार, जयश्रीराम, वर्षा आणि श्रीवंदना या बारीक धानाच्या वाणांना चांगले दर मिळत आहेत. उत्कृष्ट प्रतीच्या जयश्रीराम धानाचा कमाल भाव ४,६२० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला असून, वर्षा वाणालाही ४,५५० रुपयांपर्यंत भाव मिळाल्याची नोंद आहे. मात्र, सर्वच वाणांना समान दर मिळत नसल्याने धानाची प्रत, गुणवत्ता आणि बाजारातील मागणी यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
 
tiroda-agricultural-produce-market
 
धानशेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. यंदा सुरवातीला झालेली अतिवृष्टी व नंतर अल्प प्रमाणात झालेला पाऊस तसेच रोगराई आणि कीड प्रादुर्भावामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. अनेक शेतकर्‍यांना कीडनियंत्रणासाठी वारंवार फवारण्या कराव्या लागल्या. अशा परिस्थितीत बाजारात धानाला मिळणार्‍या दरांकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. तिरोडा बाजार समितीतील दरांमुळे उत्कृष्ट प्रतीचे धान उत्पादित करणार्‍या शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बाजार समितीतील धानाच्या दरांमधील तफावत पाहता, उत्कृष्ट प्रतीच्या धानाला मिळणारा प्रतिसाद शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. मात्र, ही तेजी किती काळ टिकणार, आगामी काळात बाजारात धानाची आवक वाढल्यानंतर दरांवर काय परिणाम होणार आणि शासकीय खरेदी सुरू झाल्यानंतर खुल्या बाजारातील व्यवहारांचे चित्र कसे राहणार, यावर शेतकर्‍यांचे आर्थिक गणित अवलंबून राहणार आहेत.

शेतकर्‍यांच्या पदरात प्रत्यक्षात किती?
धानाचे बाजारभाव वाढले असले, तरी शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही वाढला आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी, सिंचन आणि कापणी-मळणी यांवरील खर्चाचा विचार करता मिळणारा भाव किती फायदेशीर ठरतो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बाजारात उच्च प्रतीच्या धानाला चांगला दर मिळत असला, तरी प्रत्येक शेतकर्‍याचे उत्पादन आणि विक्रीदर सारखे नसतात. त्यामुळे बाजारभावातील तेजीचा प्रत्यक्ष लाभ किती शेतकर्‍यांना मिळतो, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
 
धानाला चार हजार रुपयांपेक्षा अधिक भाव मिळत असल्याचे समाधान आहे. मात्र, यंदा रोगराई आणि किडीमुळे फवारण्यांवर मोठा खर्च झाला. मजुरी, खते आणि इतर निविष्ठांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे बाजारात मिळणारा भाव आणि हातात उरणारा नफा यांची तुलना करावी लागते. धानाला चांगला भाव मिळण्याबरोबरच उत्पादन खर्च कमी होण्यासाठीही शासनाने उपाययोजना कराव्यात- भुवनलाल पारधी शेतकरी, सेजगाव