मुंबई,
sachin-tendulkar-fitness-mantraवयाच्या 53 व्या वर्षीही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर फिट आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बहुतेक खेळाडू आपल्या फिटनेसकडे लक्ष देत नाहीत. पण सचिन तेंडुलकर यांनी फिटनेसकडे नेहमी गंभीरपणे पाहिले आहे. त्यामुळेच फिट राहण्यासाठी सचिन नवनव्या गोष्टी करत असतात. चुकीच्या सवयींपासून दूर राहतात. तुम्ही फिट राहिला नाही तर नेहमी आजारी असल्यासारखं तुम्हाला वाटेल. त्यामुळे शरीर काम करणं बंद करेल, असं सचिन यांचं मत आहे. विशेष म्हणजे, सचिन फिटनेससाठी अधिक मेहनत करत नाहीत. त्यांचा मंत्र अत्यंत साधा आणि सरळ आहे. सचिन यांचा हाच फिटनेस मंत्र जाणून घेऊया.
सचिन तेंडुलकर यांच्या मते, प्रत्येकाने फक्त अर्धा तास जीममध्ये जाऊन वर्कआऊट केलं पाहिजे. मन लावून वर्कआऊट केलं पाहिजे. फिट राहण्यासाठी ते स्वत: स्ट्रेचिंग, योग आणि वेट ट्रेनिंग करतात. त्यांच्या रुटीनमध्ये डम्बल स्क्वाइट्स, लेग प्रेस, केबल रोप पुलओव्हर आणि कोबरा पोज आदी गोष्टी असतात. त्यांच्या मते, जर तुम्ही वर्कआऊट करत नसाल तर रोज अर्धा तास फिरा आणि धावा. असं केल्याने शरीर फिट आणि अॅक्टिव्ह राहील.
सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतरही क्रिकेट खेळतात. त्यासाठी रोज आधी वॉर्म अप करतात. ते रोज सुमारे तासभर क्रिकेट खेळतात. त्यामुळे मन शांत राहतं. शरीर अॅक्टिव्ह राहतं. प्रत्येकाने एक खेळ निवडला पाहिजे. तो रोज खेळला पाहिजे. त्यामुळे शरीर निरोगी आणि मन आनंदी राहतं, असं ते म्हणतात. एकदा ते म्हणाले होते की, स्पोर्ट्समन असल्यामुळे मी नैसर्गिकरित्या स्वत:ला हार्ड ट्रेन करत होतो. ते माझ्या रुटीनमध्ये आलं. पण बहुतेक लोक सोपी जीवनशैली निवडतात. डायबेटीजपासून दूर राहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सकाळी जीमला जायचं आणि वर्कआऊट करायचं. यासारखा दुसरा उत्तम पर्याय नाही, असंही ते म्हणाले.