दम्माम
saudi arabia dammam airport attack सौदी अरेबियाच्या पूर्वेकडील दम्माम शहरातील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यात एका सौदी नागरिकाचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे विमानतळाच्या काही भागांचे नुकसान झाले असून, विमानतळाकडे येणाऱ्या काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. सौदी नागरी उड्डाण प्राधिकरणाने गुरुवारी पहाटे या घटनेची माहिती दिली. बहरीन आणि कतारजवळ पर्शियन आखाताच्या किनाऱ्यालगत हा विमानतळ आहे.
विमानतळावरील हल्ला नेमका कोणी केला, याबाबत अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. इराणसमर्थित हुती बंडखोरांनीही या घटनेवर अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. दरम्यान, विमानांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या ‘फ्लाइटरडार२४’ या सेवेनुसार, विमानतळाच्या दिशेने येणाऱ्या काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले. सौदी अरेबियाच्या पूर्वेकडील भागात चार ड्रोन हल्ले हाणून पाडल्याची माहिती सौदी आघाडीने दिली आहे.
सौदी अरेबियातील प्रमुख विमानतळांना लक्ष्य करून यापूर्वीही क्षेपणास्त्रे आणि इतर प्रक्षेपकांच्या माध्यमातून हल्ले करण्यात आले आहेत. किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावरही यापूर्वी हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, ताज्या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, वाढत्या सुरक्षाविषयक चिंतेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने बुधवारी रात्री आपल्या काही राजनैतिक अधिकाऱ्यांना आणि अमेरिकन सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सौदी अरेबिया सोडण्याचे निर्देश दिले. यमनमधील इराणसमर्थित हुती बंडखोरांकडून होत असलेले जीवघेणे हल्ले आणि संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
याचदरम्यान, सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयाने देशाच्या आग्नेय भागातील अरामकोच्या तेलक्षेत्रात ड्रोन पाडल्यानंतर त्याच्या अवशेषांमुळे झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या घटनेत अन्य दोघे जखमी झाले. मृतांमध्ये नेपाळ आणि फिलिपिन्सच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश होता, तर जखमींमध्ये पाकिस्तान आणि भारतातील नागरिकांचा समावेश असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.
गेल्या महिन्यातही हुती बंडखोरांचा ड्रोन पाडल्यानंतर त्याच्या अवशेषांचा फटका बसून सौदी अरेबियात वास्तव्यास असलेल्या येमेनच्या एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. सौदी अरेबियातील जहाजे आणि तेल सुविधांना लक्ष्य करून हुती बंडखोरांनी हल्ले तीव्र केल्यानंतर सामान्य नागरिकाचा मृत्यू झाल्याची ती पहिली घटना होती.
याशिवाय, या महिन्याच्या saudi arabia dammam airport attack सुरुवातीला सौदी अरेबियाच्या पूर्व प्रांतातील अरामकोच्या प्रशासकीय इमारतीला आग लागली होती. जगातील सर्वांत मोठ्या तेल उत्पादन सुविधांपैकी एक असलेल्या अरामकोच्या या इमारतीतील आगीची घटनाही एका हल्ल्यादरम्यान घडल्याचे ऊर्जा मंत्रालयाने सांगितले होते.
सौदी अरेबियातील विमानतळे, तेलक्षेत्रे आणि अन्य महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करणाऱ्या हल्ल्यांमुळे या प्रदेशातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. किंग फहद विमानतळावरील ताज्या हल्ल्याची चौकशी सुरू असून, हल्लेखोरांची ओळख आणि घटनेमागील नेमके कारण याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.