मालेगावमध्ये नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक

जिल्हा परिषद शाळेजवळील घटना; दोषींना अटक करण्याची मागणी

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
मालेगाव,
stone-pelting-during-navdurga मालेगाव शहरात बुधवारी, २१ ऑक्टोबर रोजी नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याची घटना घडली. रात्री सुमारे ९.३० वाजता विसर्जन मिरवणूक स्थानिक जिल्हा परिषद शाळेजवळ पोहोचली असता काही समाजकंटकांनी मिरवणुकीच्या दिशेने दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जनता नवदुर्गा मंडळ, कोथळेश्वर नवदुर्गा उत्सव मंडळ आणि योगेश्वर नवदुर्गा उत्सव मंडळाच्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे. नवरात्रोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर विसर्जन मिरवणुकीत घडलेल्या या प्रकारामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
 
navdurga
 
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले. ठाणेदार राजेश खेरडे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. दगडफेक कोणत्या ठिकाणांहून झाली आणि त्यामध्ये कोणाचा सहभाग होता, याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. दुर्गामातेच्या विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित समाजकंटकांना अटक होईपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशाराही देण्यात आला. पोलीस अधीक्षकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे संबंधितांनी सांगितले.
 
नागरिकांना शांततेचे आवाहन
दरम्यान, काही समाजकंटकांमुळे शहरातील शांतता आणि उत्सवाचे वातावरण बिघडू नये, यासाठी नागरिकांनी संयम राखावा, असे आवाहन करण्यात आले. नऊ दिवस भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केलेल्या नवरात्रोत्सवाची सांगता शांततेत व्हावी, तसेच पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून करण्यात आलेली पुढील कारवाई, आरोपींची ओळख आणि गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही.