चिखली,
teachers-constituency-election आगामी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी चिखली तहसील कार्यालयात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी दैनंदिन कामकाजासाठी तहसील कार्यालयात येऊ नये, असे आवाहन चिखलीचे तहसीलदार विजय सवडे यांनी केले आहे. चिखली तहसील कार्यालयाच्या आवारात शिक्षक मतदार संघासाठी मतदान केंद्र क्रमांक ४७ आणि ४८ उभारण्यात आले आहेत. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १६३ लागू करण्यात आले आहे.

या आदेशान्वये, मतदान केंद्र आणि तहसील कार्यालय परिसरात केवळ शिक्षक मतदार, मतदान प्रतिनिधी आणि निवडणूक लढवणारे उमेदवार यांनाच प्रवेशाची मुभा असणार आहे. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आपले नेहमीचे किंवा दैनंदिन शासकीय कामकाज घेऊन शुक्रवारी तहसील कार्यालयात येणे टाळावे, जेणेकरून त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार नाही, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.