गिरडच्या सीताफळाचा गोडवा महागला!

डझणाला २५० ते ३०० रुपये भाव

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
विलास नवघरे
समुद्रपूर,
custard-apples-has-become-costlier समुद्रपूर तालुक्यातील वायगावची हळद आणि गिरडचे सीताफळ यांनी जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रासह इतर राज्यातही नाव लौकीक केले आहे. मात्र, यावर्षी सीताफळाला दुष्काळासह उष्ण वातावरणाचा फटका बसल्याने उत्पादनात कमतरता आहेच सोबत दोन महिन्यापासून पावसाने दांडी मारल्याने सीताफळांचा आकारावरही परिणाम झाला. त्यामुळे सीताफळाचा गोडवा महागला असून २५० ते ३०० रुपयांचे डझनभर सीताफळं मिळत असे तरी देखील सीताफळांचा गोडवा ग्राहकांना आकर्षित करीत आहे.
 
custard-apples-has-become-costlier
 
येथील फरीद बाबा दर्गा टेकडीच्या चारही बाजूंनी असलेल्या शेतातातील सीताफळं दग्र्या प्रमाणेच महाराष्ट्रासह इतर राज्यातही प्रसिद्ध असुन १५ ऑक्टोबरपासुन बाजारात येऊ लागली आहेत. सीताफळं निघण्याचा कालावधी फक्त १५ ते २० दिवसाचा असल्याने या २० दिवसात येथे खरीदीरादांची रेलचेल सुरू झाली आहे. मात्र, दरवर्षी मागणी जास्त व पुरवठा कमी असल्याने कित्येक चाहत्यांना या सीताफळाच्या चवेपासुन वंचित राहवे लागते. येथे असलेली सीताफळाची झाडं जुने असल्याने यातील काही झाडं दर वर्षी वाळून जात आहेत. मात्र, यात शेतकर्यांची उदासिनता असल्याने येथे नव्याने झाडांची लागवड होत नाही. कृषी विभागाकडुन इतर फळांकरिता मोठ्या प्रमाणात फलौद्यान योजनेच्या माध्यमातुन अनुदान दिले जाते.
 
 
या भागात कमीत कमी शेतकर्यांच्या बांधावर तरी सीताफळ लागवडीसाठी शेतकर्यांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. येथील जमिनीत येणार्या सीताफळाची चव दुसरीकडे कुठल्याही सीताफळांमध्ये मिळत नसल्याने महाराष्ट्रासह बाहेर राज्यातील ग्राहक सुद्धा वर्षभर वाट पाहत राहतात. या सीताफळाची विक्री व्यवस्थापन खुप सोपे आहे. गावातील बसस्टॉप स्थानिक विक्रेते टोपलीत फळ घेऊन बसतात. मात्र, ग्राहकांची संख्या पहाता कमी वेळातच त्यांचे टोपले खाली होतात. या वर्षी दुष्काळाचा फटका ग्राहकांना बसला असून सध्या एक सीताफळ २५ ते ३० रुपये नग विकल्या जात आहे. असे असले तरी सीताफळांच्या मागणीत कमतरता झाली नाही.
 
 
सीताफळ हे सिमीत दिवसाचे पीक असुन याचा विक्री कालावधी अवघ्या १५ ते २० दिवसाचा आहे. त्यातच साठवणुकीचा मोठा प्रश्न आहे. यामुळे इतर पिकाच्या तुलनेत नफा कमी असुन वर्षभर जमीन पडीत राहते. भाव जरी चांगले असले तरी पाहिजे तसे उत्पादन व फायदा नसल्याने मोठ्या प्रमाणात सीताफळ लागवड फायद्याची नाही. त्यामुळे शेतकरी सीताफळ लागवड करीत नाही अशी माहिती सीताफळ उत्पादक शेतकरी शफीक पटेल यांनी दिली.