माही विजच्या एका शब्दाने पेटला ‘बिग बॉस’मध्ये वाद

    दिनांक :23-Oct-2026
Total Views |
मुंबई,
bigg-boss-20 ‘बिग बॉस २०’ या रिॲलिटी शोमध्ये स्पर्धकांमधील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आता अभिनेत्री माही विजने भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे हिच्याबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. माहीने आम्रपालीच्या खेळावर टीका करताना तिला ‘आलू की बोरी’ अर्थात ‘बटाट्याचे पोते’ असे म्हटले. तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नाराजी व्यक्त होत असून, अनेकांनी या टिप्पणीला बॉडी शेमिंग म्हणजेच शरीरावरून अवमानित करण्याचा प्रकार म्हटले आहे.

bigg-boss-20
‘बिग बॉस’च्या अलीकडील भागात बेडरूममध्ये इतर स्पर्धकांसोबत चर्चा करत असताना माहीने आम्रपालीच्या खेळावर प्रश्न उपस्थित केले. शोमध्ये आम्रपालीचे स्वतःचे वेगळे योगदान दिसत नसल्याचे मत तिने व्यक्त केले. मात्र, खेळावर टीका करताना वापरलेल्या शब्दांमुळे हा विषय चर्चेत आला आहे. आम्रपालीच्या चाहत्यांनी माहीच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला असून, एखाद्या स्पर्धकाच्या खेळावर टीका करताना त्याच्या शरीरावर टिप्पणी करणे योग्य नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
माहीने यापूर्वीही आम्रपालीसाठी ‘जाड’ आणि ‘गोलगप्पा’ यांसारखे शब्द वापरल्याचा उल्लेख सोशल मीडियावरील चर्चेत केला जात आहे. त्यामुळे यावेळीही तिच्या वक्तव्यावरून वाद अधिक तीव्र झाला आहे. स्पर्धकांच्या खेळावर मत मांडणे वेगळे आणि त्यांच्या शारीरिक ठेवणीवरून टिप्पणी करणे वेगळे, अशी भूमिका अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी घेतली आहे.
दरम्यान, शोमध्ये माही विज भावनिक झाल्याचेही पाहायला मिळाले. अरिशफा खानसोबत झालेल्या वादानंतर तिला मुलगी ताराची आठवण आली. यावेळी तिने आपले संपूर्ण जग मुलीभोवती फिरत असल्याचे सांगितले. तसेच जय भानुशालीसोबतच्या घटस्फोटाच्या विषयावरही तिने भाष्य केले. न्यायालयात न्यायाधीशांनी तिच्याकडे चार वेळा पोटगीबाबत विचारणा केली होती; मात्र जयने ती रक्कम मिळवण्यासाठी किती मेहनत घेतली आहे, याची जाणीव असल्याने आपण नकार दिल्याचे तिने सांगितले.
या घडामोडीनंतर जय भानुशालीनेही आपल्या माजी पत्नीला पाठिंबा देणारी पोस्ट शेअर केली. तिला खंबीर राहण्याचा सल्ला देणाऱ्या या पोस्टमुळेही चर्चा रंगली आहे. एकीकडे आम्रपालीवरील टिप्पणीमुळे माही टीकेच्या भोवऱ्यात सापडली असताना, दुसरीकडे मुलीच्या आठवणीने भावुक झालेली आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणारी माहीही चर्चेचा विषय ठरली आहे.