नवी दिल्ली,
Developments in Arunachal cause a stir भारत आणि चीनदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) तणावाच्या पार्श्वभूमीवर अरुणाचल प्रदेश सीमेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे (आयटीबीपी) महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय आणि चिनी सैनिक अनेकदा आमनेसामने आल्याचे सांगितले. अशा घटना अद्यापही सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. एका कार्यक्रमात बोलताना कपूर यांनी सीमेवरील जवानांच्या कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले की, तेथे तैनात असलेल्या शौर्य कमांडो पथकाने उत्कृष्ट काम केले आहे. हा एक नवीन उपक्रम होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे भारत-चीन सीमावादाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

आयटीबीपीच्या कार्यपद्धतीतील बदलांविषयी माहिती देताना शत्रुजीत कपूर यांनी सांगितले की, या दलाची सुरुवात पर्वतीय गनिमी युद्धासाठी तयार करण्यात आलेल्या दलाच्या स्वरूपात झाली होती. त्यानंतर चीनलगतच्या सीमेवर पारंपरिक सुरक्षा दल म्हणून आयटीबीपीने जबाबदारी सांभाळली. आता गनिमी युद्धाच्या पद्धतीवर अवलंबून राहण्याऐवजी उंच पर्वतीय भागात प्रभावीपणे काम करू शकणारे दल म्हणून स्वतःला अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली. ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. स्वतःला जागतिक नेता म्हणवणाऱ्या नेतृत्वाने चीनला मोकळीक दिल्याचा आरोप त्यांनी केला. अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी सैन्यासोबत झालेल्या अलीकडील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आयटीबीपी महासंचालकांनी भारतीय जवानांच्या कामगिरीची प्रशंसा केली असली, तरी पंतप्रधानांनी या प्रकरणावर मौन बाळगल्याचे जयराम रमेश यांनी म्हटले.
भारत आणि चीन यांच्यात यापूर्वीही सीमावादावरून संघर्ष झाला आहे. २०१७ मध्ये डोकलाम परिसरात दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये दीर्घकाळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणावरून देशांतर्गत राजकारणातही मोठी चर्चा झाली होती. संसदेत डोकलामचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर काही काळ परिस्थिती तुलनेने शांत राहिली असली, तरी सीमावर्ती भागातील घडामोडींमुळे दोन्ही देशांमधील संबंधांबाबत वेळोवेळी चिंता व्यक्त केली जाते. आता अरुणाचल प्रदेश सीमेवरील आमनेसामने येण्याच्या घटनांबाबत आयटीबीपीच्या महासंचालकांनी केलेल्या विधानामुळे हा संवेदनशील विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.