महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कार जाहीर

पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार दत्ताकाका उगावकर यांना जाहीर

    दिनांक :23-Oct-2026
Total Views |
अमरावती,
maharashtra-pakshimitra-awards-2026महाराष्ट्र पक्षिमित्र संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या २०२६ च्या पक्षिमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील दत्ताकाका उगावकर यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्कारांची घोषणा महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे अमरावती येथे संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी केली. पुरस्कारांचे वितरण २६ व २७ डिसेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या ३९ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे.
 
 
pakshi
 
यावर्षीचा रमेश लाडखेडकर स्मृती पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील दत्ताकाका उगावकर यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून, हा पुरस्कार विदर्भ पक्षिमित्र मंचद्वारे डॉ. अनिल पिंपळापुरे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. दुसरा पुरस्कार डॉ. जी. एन. वानखेडे स्मृती पक्षी संशोधन पुरस्कार सोलापूर येथील राहुल वंजारी यांना जाहीर करण्यात आला आहे. तिसरा पुरस्कार स्व. नामदेवराव बहादुरे पक्षिमित्र पुरस्कार ताडदेव, मुंबई येथील मेघना दुर्वे मिश्रा यांना जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार नागपूर येथील महाराष्ट्र पक्षिमित्रचे सदस्य अनिल बहादुरे यांच्यातर्फे देण्यात आला आहे.
 
 
चौथा पुरस्कार स्व. रामभाऊ शिरोडे (वाणी) स्मृती पक्षिमित्र पक्षी जनजागृती पुरस्कार सुमेध वाघमारे यांना तसेच पेठ वडगाव जिल्हा कोल्हापूर येथील निसर्गप्रेमी मित्र मंडळ या संस्थेस जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून, हा पुरस्कार अविनाश शिरोडे नाशिक यांनी प्रायोजित केला आहे. पक्षी संवर्धनासाठी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने लिखाण करणारे जागृत व अभ्यासू पत्रकारासाठी यावर्षी प्रथमच दिला जाणारा पहिला स्व. प्रकाशसिंह नारायणसिंह मोरे स्मृती पक्षिमित्र पत्रकारिता पुरस्कार अकोला येथील विलास देशमुख आणि नाशिक येथील प्रा. आनंद बोरा यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार पक्षिमित्र अंकाचे संपादक किरण मोरे यांनी प्रायोजित केलेला आहे.