दलेर मेहंदींच्या अपमानावर मिका संतापला

    दिनांक :23-Oct-2026
Total Views |
मुंबई,
daler-mehndi प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांच्याबाबत उत्तराखंडचे मंत्री सुबोध उनियाल यांनी केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद अद्याप शमलेला नाही. दलेर मेहंदी यांचा भाऊ आणि गायक मिका सिंग याने या प्रकरणात पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट करत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. सुबोध उनियाल यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देऊन दलेर मेहंदी यांची माफी मागावी, अशी मिकाची अपेक्षा आहे. यासाठी मंत्र्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करावा, असे आवाहनही त्याने केले आहे.

daler-mehndi
मिका सिंगने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत मुख्यमंत्री धामी यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. दलेर मेहंदी यांच्याशी संबंधित प्रकरणावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन करून संवाद साधल्याचे त्याने सांगितले. धामी यांच्या या पुढाकाराचे कौतुक करत मिकाने त्यांना नम्र आणि साधे व्यक्तिमत्त्व असे संबोधले. मात्र, या प्रकरणात संबंधित मंत्र्यांनीही पुढे येऊन आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे त्याने नमूद केले.
आपल्या पोस्टमध्ये मिकाने मुख्यमंत्र्यांना विनंती केली की, त्यांनी सुबोध उनियाल यांना एक छोटा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यास सांगावे. दलेर मेहंदी यांच्या कार्यक्रमादरम्यान ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचा अर्थ निघेल असे वक्तव्य केल्याबद्दल मंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे आणि माफी मागावी, अशी त्याची मागणी आहे. गैरसमज निर्माण होऊ शकतात; मात्र ते परस्पर आदर आणि सभ्यतेने दूर करता येतात, असेही मिकाने म्हटले आहे. या छोट्या पावलामुळे वादावर पडदा पडेल आणि दलेर मेहंदी यांच्या प्रतिष्ठेचा सन्मान राखला जाईल, अशी आशा त्याने व्यक्त केली.
या वादाची सुरुवात नवरात्रीच्या काळात उत्तराखंडमध्ये आयोजित एका कार्यक्रमानंतर झाली. या कार्यक्रमात दलेर मेहंदी यांनी सादरीकरण केले होते. कार्यक्रमादरम्यान त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर मंत्री सुबोध उनियाल यांनी दलेर मेहंदी यांनी मद्यधुंद अवस्थेत कार्यक्रम सादर केल्याचा आरोप केल्याचे सांगितले जाते. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करण्यात आली. आपल्या भावाबद्दल करण्यात आलेल्या या टिप्पणीवर मिका सिंगने आक्षेप घेत स्पष्टीकरण आणि माफीची मागणी केली.
दरम्यान, वाद वाढत असताना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मिका सिंगशी संवाद साधत हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला. मिकाने मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराबद्दल आभार मानले असले, तरी सुबोध उनियाल यांनी सार्वजनिकरीत्या माफी मागावी, या मागणीवर तो ठाम आहे. आता या प्रकरणावर मंत्री सुबोध उनियाल काय भूमिका घेतात आणि वादावर तोडगा निघतो का, याकडे लक्ष लागले आहे.