नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

मुख्यमंत्री फडणवीस, गडकरींसह दिग्गजांचे मतदान; सुधाकर कोहळे यांचा विजयाचा दावा;

    दिनांक :23-Oct-2026
Total Views |
नागपूर,
nagpur-graduate-election-2026विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल सोले यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार अभिजित वंजारी आणि महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
 

elec 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मतदानाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. गडकरी यांनी महाल येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये मतदान केले. भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल सोले यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
 
 
वंजारी यांचा २५ हजार मतांच्या आघाडीचा दावा
महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार अभिजित वंजारी यांनी सक्करदरा येथील मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालयात पत्नीसह मतदान केले. यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. या निवडणुकीत सुमारे ८,२०० दुबार मतदार असल्याचा दावा करत, आपण २५ हजारांपेक्षा अधिक मतांच्या फरकाने विजयी होऊ, असे वंजारी म्हणाले.
 

van 
 
ही भाजपची पारंपरिक जागा; १०० टक्के विजय आमचाच!'
महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी मानेवाडा येथील उल्हासनगरमधील सिद्धेश्वर विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान केले. ही भाजपची पारंपरिक जागा असून, या निवडणुकीत १०० टक्के आमचाच विजय होणार, असा विश्वास कोहळे यांनी व्यक्त केला.
 
४४५ मतदान केंद्रांवर मतदान
नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी एकूण ४४५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये लढत होत असून, पदवीधर मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. उमेदवारांच्या विजयाच्या दाव्यांमुळे निवडणुकीतील उत्सुकता वाढली आहे.