दुष्काळाच्या छायेत हळद रुसली

उत्पादन घटण्याची शक्यता

    दिनांक :23-Oct-2026
Total Views |
समुद्रपूर,
possibility-of-a-decline-in-production तालुक्यातील सुप्रसिद्ध वायगाव हळद यंदा दुष्काळाच्या छायेत सापडली आहे. ऐन फुलोर्याच्या आणि कंद भरणीच्या काळातच पावसाने दडी मारल्याने पिकाला पाण्याचा ताण बसला आहे. हिरव्यागार पिकाच्या फुलोर्यावर आता करपण्याची चिन्हे दिसू लागल्याने हळद उत्पादक शेतकर्यांची चिंता वाढली आहे. यामुळे वायगाव हळद उत्पादक संकटात सापडला असून पीक वाचविण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरू आहे.
 
 
possibility-of-a-decline-in-production
 
यावर्षी वारंवार पावसाचा खंड पडल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. सध्या हळद पीक फुलोर्यावर असून कंद भरण्याची निर्णायक अवस्था सुरू आहे. या काळात पिकाला पुरेसा ओलावा मिळणे गरजेचे असते. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने पिकाची वाढ खुंटली असून कंदाचा आकार, वजन आणि अंतिम उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पाण्याच्या ताणासोबतच काही भागात हळदीवर करपा रोगाचा प्रादुर्भावही झाला आहे. रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रतिकूल हवामानामुळे पिकाची गुणवत्ता तसेच उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी उपलब्ध पाण्याने सिंचन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, पाण्याची मर्यादित उपलब्धता आणि वाढता सिंचन खर्च यामुळे शेतकर्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे.
 
सध्या कंद भरणीचा निर्णायक टप्पा सुरू असल्याने पुढील काही दिवस हळद उत्पादकांसाठी महत्त्वाचे आहेत. पावसाची दमदार हजेरी लागली नाही तर उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता व्यक्त करीत आहेत. त्यामुळे देशभर मागणी असलेल्या वायगाव हळदीसमोर यंदा दुष्काळाचे आव्हान आहे. दुष्काळी स्थिती, पावसाचा खंड, करपा रोगाचा प्रादुर्भाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे हळद उत्पादकांसाठी यंदाचा हंगाम कसोटीचा ठरत आहे.
 
 
वायगावची हळद आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांमुळे देशभर मागणी असलेल्या उत्पादनांपैकी एक आहे. हळदीतील औषधी गुणधर्म, रंग, स्वाद आणि वैशिष्ट्यांमुळे या हळदीला विशेष ओळख मिळाली आहे. वायगाव हळदीला भौगोलिक नामनिर्देशन (जीआय) मिळाले आहे. मात्र, यावर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे दरही गगनाला भिडण्याचा अंदाज आहे. सध्या ५०० रुपये किलो हळद पावडरला भाव मिळतो आहे.
 
तालुक्यात ५५० एकरावर लागवड
समुद्रपूर तालुक्यात वायगाव हळद नंदोरी, मंगरूळ, गिरड, कांढळी, समुद्रपूर या महसूल मंडळातील गावांमध्ये ५५० एकरात लागवड झाली आहे. त्यामुळे यंदाच्या प्रतिकूल हवामानाचा फटका केवळ एका पिकाला बसणार नसून या परिसरातील शेतकर्यांच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.