गोंदिया,
rashtriya-swayamsevak-sangh राष्ट्रभक्ती, संस्कार, सामाजिक एकात्मता आणि सेवाभावाची भावना समाजात जागृत करण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने करीत आहे. कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्य आणि स्वबोध या पंचपरिवर्तनातील पाच प्रमुख मुद्द्यांच्या माध्यमातून देश व समाजाला संघटित करण्याचे कार्य संघाच्या वतीने केले जात आहे, असे प्रतिपादन भंडारा विभाग संघचालक दलजीतसिंग खालसा यांनी केले.

गोरेगाव येथील शिवाजी पार्क येथे गुरुवारी २२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेच्या वतीने आयोजित विजयादशमी तथा शस्त्रपूजन उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक गेंदलाल येडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी पार्क येथून पथसंचलनाने झाली. मुख्य मार्गावरून ठाणा रोडपर्यंत मार्गक्रमण करीत पथसंचलन पुन्हा छत्रपती शिवाजी पार्क येथे परतले. त्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी स्वयंसेवकांनी व्यायाम व योगाची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. सांघिक गीत, अमृतवचन, सुभाषित आणि वैयक्तिक गीत सादर करण्यात आले. त्यानंतर प्रमुख अतिथींचा परिचय, प्रास्ताविक, अतिथी उद्बोधन आणि प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन झाले. एकात्मता मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, परिचय व आभार प्रदर्शन खंड कार्यवाह श्रीकांत चौधरी यांनी केले. प्रसंगी शेकडो स्वयंसेवकांच्या उपस्थितीत विजयादशमी तथा शस्त्रपूजन उत्सव पार पडला.