गोंदियात अभाविपचे जिल्हास्तरीय ‘शौर्या’ युवती संमेलन थाटात

    दिनांक :23-Oct-2026
Total Views |
गोंदिया,
shaurya-youth-womens-conference अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गोंदिया जिल्ह्याच्या वतीने येथील नारायणी लॉन येथे गुरवारी २२ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय ‘शौर्या’ युवती संमेलनाचे आयोजन करण्यात आले. युवतींच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संस्कार आणि सांस्कृतिक मूल्यांना प्रोत्साहन देणारे हे संमेलन प्रेरणादायी ठरले. युवतीशक्तीला योग्य दिशा देऊन समाज आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचा संदेश या संमेलनातून देण्यात आला. या संमेलनाचे उद्घाटन सविता अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्त्या म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय मंत्री पायल किनाके उपस्थित होत्या. प्रमुख उपस्थितांमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी नंदिनी चानपूरकर, स्वागत समितीच्या अध्यक्ष डॉ. श्रीष्टी केलनका, सचिव शकुंतला पटले आणि युवती संमेलनप्रमुख निकिता बावनकर यांचा समावेश होता.
 
 
shaurya-youth-womens-conference
 
यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष उमेश आगासे, भंडारा-गोंदिया विभाग संघटनमंत्री राहुल श्यामकुवर, गोंदिया जिल्हा संघटनमंत्री रोहित श्रीरामवार, गोंदिया नगर अध्यक्ष प्रा. दामोदर द्विवेदी आणि गोंदिया नगरमंत्री निर्भय डोलारे यांची प्रमुख उपस्थिती होती. आजच्या काळात युवतींनी शिक्षण, सामाजिक कार्य, नेतृत्व आणि राष्ट्रनिर्माणाच्या विविध क्षेत्रांत पुढाकार घेणे आवश्यक आहे. युवतींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून देणे, तसेच भारतीय संस्कृती व संस्कारांची मूल्ये जपत सक्षम आणि स्वावलंबी व्यक्तिमत्त्व घडविणे, हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश होता. ‘शौर्या’ युवती संमेलनाच्या माध्यमातून युवतींना संघटित होऊन समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. युवतीशक्ती ही राष्ट्राची महत्त्वपूर्ण शक्ती असून, या शक्तीला योग्य दिशा मिळाल्यास समाजाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देता येऊ शकते, असे विचार या संमेलनातून अधोरेखित करण्यात आले. आयोजित या संमेलनामुळे युवतींमध्ये सामाजिक जाणीव, सांस्कृतिक अभिमान, नेतृत्वक्षमता आणि राष्ट्रसेवेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी आयोजकांनी व्यक्त केला.