स्पाय पेन कसा असतो मला पाठवा सुप्रिया ताई...

    दिनांक :23-Oct-2026
Total Views |
पराग मगर

नागपूर,
spy-pen पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. पदवीधर आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. विधान परिषद हे ज्येष्ठांचे सभागृह असून, त्यासाठी प्रतिनिधी निवडण्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.रवीनगर येथील दादाजी धुनिवाले शाळेत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नागपूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागांतील पदवीधर, तर अमरावती आणि पुणे विभागांतील शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होत आहे. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडेल आणि योग्य निकाल लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकशाहीत अशीच शांततापूर्ण प्रक्रिया अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले. स्पाय पेन प्रकरणाबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, “स्पाय पेन कसा असतो, हे सुप्रिया सुळे यांनी मला पाठवावे. तो समजून घेतल्यानंतर त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.” यावेळी नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे आणि त्यांना पाठिंबा देणारे अपक्ष उमेदवार प्रा. अनिल सोले उपस्थित होते.
 
cm fadnavis
संभाषणाची क्लिप आत्ताच कशी आली
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेबाबत विचारले असता, समोर आलेल्या क्लिप अथवा संभाषणाची संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. “अडीच वर्षांनंतर हे संभाषण आताच बाहेर येण्याचे कारण काय, कुणाला लक्ष्य केले जात आहे आणि यामागील हेतू काय, याचीही तपासणी केली जाईल,” असे फडणवीस म्हणाले. मनोज जरांगे यांच्यासह शिवसेना आणि भाजपच्या शिष्टमंडळानेही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केल्याचे त्यांनी नमूद केले.