दिल्ली अग्रलेख
fox report गेल्या काही वर्षांत जग खूप जवळ आले आहे. जवळ येण्याचा अर्थ दोन देशांतील भौगोलिक अंतर कमी झाले असा घ्यायचा नसतो. अत्याधुनिक संपर्क व्यवस्था, तंत्रज्ञानाने तसेच दळणवळणाच्या साधनांनी जगाला जवळ आणले आहे, असा त्याचा अर्थ होतो. ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ अशी एका मोबाईल कंपनीची जाहिरात होती. आता जवळपास तसेच झाले आहे. एका देशातील पर्यावरण आणि हवामानाचा दुसर्या देशावर सहज परिणाम होतो. कधी हा परिणाम अनुकूल असतो तर कधी प्रतिकूल, पण काही ना काही परिणाम होतोच. एका देशात वादळी पाऊस आला तर दुसर्या देशात गारवा निर्माण होतो, एका देशात बर्फवृष्टी झाली की दुसर्या देशात थंडी पडते. आता तर एका देशात आंदोलन सुरू झाले की त्याची धग शेजारील देशांतही पोहोचते. या संदर्भात युरोपचे ताजे उदाहरण आपल्यासमोर आहे. अशा आंदोलनांचे जे लोण इतर देशांत पोहोचते, त्यात काही न काही कार्यकारणभाव असतो. एका आंदोलनाचा थेट दुसर्या आंदोलनाशी संबंध नसला तरी त्यात काही अदृश्य धागेदोरे असतात. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा भारतात सुरू असलेल्या तरुणांच्या आंदोलनाशी संबंध आहे, असे म्हटले तर त्यावर सहजासहजी कोणाचा विश्वास बसणार नाही. पण ही वस्तुस्थिती असल्याचे आता उघड झाले आहे.
अलिकडेच झालेल्या फ्रान्समधील आंदोलनाला हिंसाचाराचे गालबोट लागले. भारतातील आंदोलनातही सुरुवातीला हिंसाचार झाला होता, पण सुदैवाने सरकारच्या सतर्कतेने आणि तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे तो लगेच आटोक्यात आला. त्याचे लोण देशाच्या अन्य भागांत पोहोचले नाही. फ्रान्समध्ये तसे झाले नाही. तेथील हिंसाचाराचा वणवा देशभर पसरला आणि तो तेथील सरकारला अजूनही पूर्णपणे आटोक्यात आणता आला नाही. अशात हा अहवाल आला आहे आणि फ्रान्समध्ये हिंसक रूप घेतलेले तरुणांचे आंदोलन आणि भारतातील तरुणांचे आंदोलन याचा संबंध आहे, असे त्यात सांगितलेले आहे. देशात कुठेही अशांतता निर्माण झाली तर त्यात बाह्य शक्तींचा हात असल्याचा आरोप केला जात होता. हा आरोप निराधार आणि नाहक केलेला नसायचा तर त्यात काही तरी तथ्य असायचे, याची ताज्या घटनाक्रमाने खात्री पटू लागली आहे आणि या अहवालाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
भारत आणि फ्रान्समध्ये, विशेषत: युरोपातील काही देशांत सुरू असलेल्या आंदोलनांमागे, ९ देशांतील शंभरावर इस्लामी आणि साम्यवादी संघटना असल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेतील फॉक्स न्यूज डिजिटल इन्व्हेस्टिगेशनच्या अहवालातून करण्यात आला आहे. या अहवालाकडे कुणालाही दुर्लक्ष करता येणार नाही. ज्या देशात शांतता आहे, जे देश प्रगतिपथावर आहेत, ज्यांची आर्थिक प्रगती वेगाने होत आहे, तेथे असंतोष निर्माण करणे हे काही विघ्नसंतोषी वृत्तीच्या लोकांचे काम असते. अशी वृत्ती अनेक संघटनांत आणि काही वेळेला देशांमध्येही असते. उदाहरणार्थ पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेली भारताची प्रगती सहन होत नाही. त्यामुळे कोणत्या तरी मार्गाने भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असतो. भारतात घातपाती आणि दहशतवादी कारवायाही घडवून आणायला पाकिस्तान मागेपुढे पाहत नाही, हे आतापर्यंत अनेकवेळा सिद्ध झाले आहे. सोबतीला आणखी काही शेजारी या ना त्या प्रकारे असतात, हेही आपण पाहिले आहे. गेल्या काही वर्षांत सर्वत्र तरुण पिढीत असंतोष वाढत आहे. त्याला भारत अपवाद नाही. या असंतोषाचा फायदा उचलत अस्थिरता निर्माण करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे फ्रान्समध्ये आणि नंतर युरोपातील काही देशांत दिसले. फ्रान्सशिवाय, स्पेन, इटली, पोर्तुगाल आणि अल्बानिया आदी देश हिंसाचाराच्या लाटेत होरपळून निघत आहेत. युरोपातील अनेक देशांतील हिंसक दंगलींचा समन्वय, संघटन आणि विस्तार करण्याचे म्हणजे त्याला खतपाणी घालण्याचे काम तिकडच्या शंभरावर इस्लामी संघटना तसेच साम्यवादी संघटना करत असल्याचा अहवाल या पृष्ठभूमीवर धक्कादायक ठरतो.fox report भारतातील घटनाक्रमाशी या कारस्थानाचा संबंध आहे. इंडियन अलायन्स पॅरिस (आयएपी) ही फ्रान्समधील संघटना फ्रान्स आणि भारतातील देशविघातक चळवळींना एका सूत्रात जोडण्याचे काम करीत असून, मॅनहॅटनमधील पीपल्स फोरम ही संघटना या कामात हातभार लावत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. कोणत्याही गोष्टीला पैसा लागत असतो. फ्रान्स तसेच युरोपातील देशातील हिंसाचार घडवणार्या असामाजिक संघटनांना शांघायमधील अमेरिकी वंशाचे उद्योगपती नेव्हिल रॉय सिंघम हे वित्तपुरवठा करत असल्याचा आरोपही या अहवालातून करण्यात आला आहे. याच संदर्भात पॅरिसमधील भारतीय वंशाचे जॉय बॅनर्जी यांचे नावही या अहवालात असून, त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. फ्रान्स तसेच युरोपातील काही देशांत जशी परिस्थिती आहे, तशी परिस्थिती सुदैवाने भारतात निर्माण झालेली नाही. फ्रान्स आणि युरोपातील अन्य देशांत तेथील सरकारविरोधात जेवढा असंतोष आहे, त्या तुलनेत भारतातील असंतोषाचे प्रमाण मर्यादित आहे. सरकार कुणाचेही असले तरी जनतेत राजी-नाराजी असतेच. तशी ती भारतातही थोडीफार असणारच. पण, आगडोंब उसळावा, अशी स्थिती भारतात नाही हे नक्की. फ्रान्स आणि युरोपातील देशातील खालावलेली शिक्षणव्यवस्था, रोजगाराच्या संधीत होत असलेली घट, महागाई तसेच ढासळती अर्थव्यवस्था या कारणांमुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे. वाढते कर्ज आणि त्यावरील व्याजामुळे या देशात कल्याणकारी योजनांवरील खर्चात सातत्याने कपात होत आहे. या परिस्थितीचा फायदा इस्लामी आणि साम्यवादी संघटनांनी घेतला नसता तरच नवल होते. दुर्दैवाने राष्ट्रहिताच्या दृष्टीने या आंदोलनांकडे पाहणे अद्याप भारतातील सरकारच्या विरोधकांना जमले नाही. त्यामुळे इस्लामी तसेच साम्यवादी संघटनांच्या घातक मनसुब्यांना आपल्या देशातील विरोधी पक्ष अप्रत्यक्षरीत्या खतपाणी घालत आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये. काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी, डाव्या संघटना तसेच कॉक्रोच जनता पार्टीसारखी संघटना विदेशी शक्तींचे हस्तक झाल्यासारखे वागत आहेत, ही चिंताजनक बाब म्हटली पाहिजे. वास्तवात फ्रान्स आणि युरोपातील हिंसाचारग्रस्त देशांतील राजवटी तसेच भारतातील मोदी सरकार यांच्यात कार्यक्षमता, गुणवत्ता आणि लोकप्रियतेच्या बाबतीत जमीन-अस्मानचा फरक आहे. मोदी सरकारने गेल्या बारा वर्षांत लोककल्याणाच्या जेवढ्या योजना राबवल्या, त्यांची बरोबरी युरोपातील हे सारे देश मिळूनही करू शकत नाही. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसोबत शिक्षण आणि आरोग्यसेवा यांतही मोदी सरकारने दिलासादायक कामगिरी केली आहे. तरीही मोदी सरकारविरुद्ध जनतेत प्रचंड असंतोष आहे, असे वातावरण निर्माण करण्याचा काही शक्तींचा प्रयत्न आहे. त्याला अद्याप यश आलेले नाही आणि येणारही नाही. देशात दंगली घडवण्याचा, अस्थिरता निर्माण करण्याचा शंभरावर इस्लामी तसेच साम्यवादी संघटनाचा प्रयत्न फ्रान्स आणि युरोपातील काही देशांत यशस्वी होताना दिसत असला तरी भारतात तो कदापि यशस्वी होऊ शकणार नाही. कारण भारतीय जनतेचे पहिले प्रेम मातृभूमीवर आहे. या मातीशी ही जनता कधीच विश्वासघात करू शकत नाही. वेळप्रसंगी भारतीय जनता एकवेळ अर्धपोटी राहील, फाटक्या कपड्यात वावरेल, पण देशाची एकता आणि अखंडता कदापि धोक्यात येऊ देणार नाही. त्यामुळेच भारताकडे वाकडी नजर करण्याची आतापर्यंत कोणाची हिंमत झाली नाही. कोणी तशी हिंमत केली तर त्याला धडा शिकवण्याची हिंमत राष्ट्रभक्त भारतीयांमध्ये आहे. पण, राष्ट्रप्रेमाला सावधगिरीची साथ आवश्यक असते, हेही लक्षात ठेवले पाहिजे. देशाचे शत्रू ओळखण्यात चूक होता कामा नये!