मुंबई
aryan khan बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर आता मनोरंजनविश्वात आपला विस्तार करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. रेड चिलीज एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेसाठी तो नव्या लेखकांचा शोध घेत असल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘व्हरायटी इंडिया’च्या अहवालानुसार, आगामी चित्रपट आणि वेब सीरिजसाठी नव्या प्रतिभावान लेखकांची फळी उभारण्याचा आर्यनचा प्रयत्न आहे. त्याच्या पहिल्या सीरिजला ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ला मिळालेल्या प्रतिसादानंतर त्याने आता आगामी स्ट्रीमिंग प्रकल्पांच्या कथानिर्मितीवरही लक्ष केंद्रित केले आहे.
आर्यन खानला केवळ दिग्दर्शन किंवा सर्जनशील नियोजनापुरते मर्यादित न राहता, कथालेखनाच्या प्रक्रियेतही सक्रिय सहभाग घ्यायचा असल्याचे सांगितले जात आहे. सध्या तो विविध पटकथा वाचत असून, क्रिएटिव्ह डायरेक्टर्सच्या एका चमूसोबत काम करत असल्याची माहिती आहे. आजच्या तरुणांचे जीवन, त्यांची नाती, बदलत्या विचारसरणी आणि त्यांच्यासमोरील आव्हाने यांचे वास्तववादी चित्रण करणाऱ्या कथा शोधण्यावर या प्रक्रियेत भर दिला जात आहे.
रेड चिलीज एंटरटेनमेंटसाठी भविष्यात दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण आशय निर्माण करता यावा, यासाठी नव्या लेखकांचा स्वतंत्र समूह तयार करण्याची योजना असल्याचे वृत्त आहे. वेगळ्या दृष्टिकोनातून कथा मांडणाऱ्या आणि समकालीन प्रेक्षकांच्या आवडीनिवडी समजून घेणाऱ्या लेखकांना संधी देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. या माध्यमातून तयार होणाऱ्या कथांचा पुढे चित्रपट किंवा ओटीटीवरील मालिकांसाठी विचार केला जाऊ शकतो. मात्र, आर्यनच्या आगामी प्रकल्पांची नावे, कथानक किंवा प्रदर्शनाचे वेळापत्रक याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
आर्यन खानने सप्टेंबर २०२५ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या मालिकेतून क्रिएटर आणि दिग्दर्शक म्हणून मनोरंजनविश्वात पदार्पण केले. रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली गौरी खान यांनी या मालिकेची निर्मिती केली होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील अंतर्गत राजकारण, स्पर्धा, संघर्ष आणि नातेसंबंधांवर विनोद व उपरोधिक भाष्य करणारी ही मालिका होती.
या मालिकेत एका तरुण कलाकाराचा प्रवास दाखवण्यात आला होता. बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात त्याला चित्रपटसृष्टीतील राजकारण, व्यावसायिक स्पर्धा आणि नात्यांमधील गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. विनोद, नाट्य आणि व्यंग यांच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीचे विविध पैलू मांडण्यात आले होते. या मालिकेला मिळालेल्या प्रतिसादानंतर आर्यन आता नव्या कथांवर आणि लेखकांच्या शोधावर भर देत असल्याचे वृत्त आहे.
आर्यन खानचा हा पुढील प्रयत्न रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या आगामी आशय निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. नव्या लेखकांना संधी देण्यासोबतच स्वतःही कथालेखनात सहभागी होण्याच्या त्याच्या भूमिकेमुळे आगामी प्रकल्पांविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या नव्या उपक्रमातून कोणत्या कथा आणि मालिका प्रेक्षकांसमोर येतात, याकडे मनोरंजनविश्वाचे लक्ष लागले आहे.