मुंबई
ashwini ekbote मराठी चित्रपट, नाटक आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे अकाली निधन आजही त्यांच्या चाहत्यांच्या आणि सहकलाकारांच्या मनाला चटका लावते. अभिनयासोबतच शास्त्रीय नृत्यातही त्यांनी उल्लेखनीय प्रावीण्य मिळवले होते. कलेशी अखेरपर्यंत नाते जपणाऱ्या अश्विनी यांनी रंगमंचावर नृत्य सादर करत असतानाच जगाचा निरोप घेतला. अवघ्या ४४ व्या वर्षी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला होता.
२२ ऑक्टोबर २०१६ हा दिवस मराठी नाट्यसृष्टीसाठी काळा दिवस ठरला. पुण्यातील भरत नाट्य मंदिर येथे ‘नाट्यत्रिविधा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अश्विनी एकबोटे सहभागी झाल्या होत्या. सादरीकरण सुरू असताना त्या नेहमीप्रमाणे आपल्या कलेत तल्लीन झाल्या होत्या. मात्र, कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात नृत्य करत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्या रंगमंचावर कोसळल्या.
सुरुवातीला उपस्थितांना हा प्रसंग सादरीकरणाचाच भाग असावा, असे वाटले. मात्र, काही क्षणांतच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. कार्यक्रम तातडीने थांबवण्यात आला आणि अश्विनी यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. रंगमंचावर घडलेल्या या अनपेक्षित घटनेने उपस्थितांना मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकलाकार आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली.
अश्विनी एकबोटे यांनी आपल्या कारकिर्दीत अभिनय, नृत्य आणि रंगभूमी या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय काम केले होते. त्यांच्या सहजसुंदर अभिनयासोबतच कलेप्रती असलेली निष्ठा आणि मेहनत यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी समाजमाध्यमांवर शोक व्यक्त केला. प्रत्यक्ष रंगमंचावर सादरीकरण करताना त्यांची झालेली एक्झिट ही घटना मराठी मनोरंजनविश्वासाठी कायमची वेदनादायी आठवण ठरली.
चित्रपटांमध्येही अश्विनी यांनी विविध भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. ‘देबू’, ‘महागुरू’, ‘बावरे प्रेम हे’, ‘तप्तपदी’, ‘डंक्यावर डंका’, ‘आरंभ’ आणि ‘कॉफी आणि बरंच काही’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी आपल्या अभिनयातील वैविध्य दाखवून दिले.