जॉर्डनमधील चर्चवरील हल्ल्याने भारतही व्यथित

जयशंकरांनी व्यक्त केले दुःख

    दिनांक :24-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Attacks on churches in Jordan जॉर्डनमधील कराक शहरात चर्चमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी घडलेल्या या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला, तर अन्य ३४ जण जखमी झाले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेला घृणास्पद आणि भ्याड कृत्य संबोधत मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली आहे. या कठीण प्रसंगी भारत जॉर्डन सरकार आणि तेथील जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले. जगभरात दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरोधात लढा देण्याची भारताची भूमिका कायम असल्याचा पुनरुच्चारही करण्यात आला.
 
 
45658679
 
 
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील संदेशातून त्यांनी चर्चवरील हल्ल्याचा निषेध केला. या हिंसक घटनेत निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने आपण व्यथित झाल्याचे त्यांनी नमूद केले. मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करत जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली. दहशतवादाच्या प्रत्येक स्वरूपाविरोधात भारताची भूमिका ठाम असून, अशा घटनांमुळे दहशतवादाविरोधातील लढ्याचा निर्धार कमी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरही निषेध व्यक्त होत असून, धार्मिक स्थळे आणि निष्पाप नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
 
 
अल जझिराच्या वृत्तानुसार, कराक परिसरातील हमूद गावात असलेल्या ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये अंत्यसंस्कार सुरू असताना बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला असून ३४ जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय बिन हुसेन यांनीही या हल्ल्याचा निषेध करत हल्लेखोरांना कठोर शिक्षा दिली जाईल, असा इशारा दिला. गोळीबाराच्या माध्यमातून जॉर्डनच्या नागरिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना देशाची एकजूट मोडता येणार नाही, असे त्यांनी म्हटले. देशाच्या उत्तर भागापासून दक्षिण भागापर्यंत सर्व नागरिक एकाच भूमीशी आणि समान भविष्याशी जोडलेले असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक नागरिकाचे जीवन मौल्यवान असून, देशाला धमकावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही राजांनी स्पष्ट केले. या हल्ल्यामुळे जॉर्डनमध्ये संताप आणि दुःखाचे वातावरण असून, विविध देशांच्या नेत्यांसह संयुक्त राष्ट्रांकडूनही शोक व्यक्त करण्यात आल्याचे वृत्त आहे.